हॅट्रिक बॉलच्या आधी धोनीने दिला होता हा सल्ला, शमीने केला खुलासा

शनिवारी(22 जून) आयसीसी 2019 विश्वचषकात भारत विरुद्ध अफगाणिस्तान संघात द रोज बॉल स्टेडियमवर 28 वा सामना पार पडला. या सामन्यात भारताने 11 धावांनी विजय मिळवला. या विजयात भारताचा वेगवान गोलंदाज मोहम्मद शमीने हॅट्रिक घेत महत्त्वाचा वाटा उचलला.

या सामन्यात अफगाणिस्तानला शेवटच्या षटकात विजयासाठी 16 धावांची गरज होती. तर भारताला 3 विकेट्सची गरज होती. यावेळी या षटकात गोलंदाजी करण्यासाठी मोहम्मद शमीच्या हाती चेंडू सोपवण्यात आला.

या षटकातील पहिल्याच चेंडूवर अफगाणिस्तानकडून मोहम्मद नबीने चौकार ठोकत इरादे स्पष्ट केले. पण त्याला दुसऱ्या चेंडूवर एकही धाव घेतला आली नाही.

त्यानंतर त्याने शमीने टाकलेल्या या षटकातील तिसऱ्या चेंडूवर मोठा फटका मारण्याचा प्रयत्न केला. परंतू हार्दिक पंड्याने त्याचा झेल घेतला. त्यामुळे त्याला विकेट गमवावी लागली. त्याच्या पुढच्याच सलग दोन चेंडूंवर शमीने अनुक्रमे अफताब आलम आणि मुजीब उर रेहमानला शुन्य धावेवर त्रिफळाचीत केले आणि त्याची विश्वचषकातील पहिली हॅट्रिक साजरी केली.

या षटकादरम्यान शमी आणि भारताचा यष्टीरक्षक एमएस धोनीमध्ये काही संवाद झाले होते. या संवादादरम्यान धोनीने शमीला योजनेवर ठाम राहण्यास सांगितले होते. याबद्दल सामना संपल्यावर शमीने खूलासा केला आहे.

शमीने सांगितले की ‘योजना साधी होती. गोलंदाजी करताना यॉर्कर टाकायचा होता. माही भाईने(धोनीने) हीच गोष्ट सांगितली होती. त्याने सांगितले काहीही बदलण्याचा प्रयत्न करु नको. तूला हॅट्रिक मिळण्याची चांगली संधी आहे. अशी संधी खूप दुर्मिळ असते. तूला सारखीच गोष्ट करायची आहे. मी ते केले आणि मी खूप आनंदी आहे की मला हॅट्रिक मिळाली.’

या सामन्याआधी भुवनेश्वर कुमारला हॅमस्ट्रिंग दुखापत झाल्याने शमीला या सामन्यासाठी 11 जणांच्या भारतीय संघात संधी मिळाली होती. याबद्दल तो म्हणाला, ’11 जणांमध्ये संधी मिळणे ही भाग्याची गोष्ट आहे. मला जेव्हाही संधी मिळेल तेव्हा मी त्याचा फायदा घेण्यास तयार आहे. हॅट्रिकबद्दल सांगायचे झाल्यास विश्वचषकात ही खूप दुर्मिळ गोष्ट आहे. मी आनंदी आहे.’

तसेच शेवटच्या षटकातील योजनेबद्दल शमी म्हणाला, ‘त्यावेळी विचार करायला वेळ नव्हता. स्वत:च्या कौशल्यावर विश्वास ठेवणे हा एकच पर्याय होता. याशिवाय खूप पर्याय नव्हते.’

‘जर आणखी विविधतेने गोलंदाजी टाकण्याचा प्रयत्न केला असता तर आणखी धावा जाण्याची संधी होती. माझा विचार फक्त एवढाच होता की फलंदाजाच्या मनात काय चालले आहे हे ओळखण्यापेक्षा माझ्या योजनाची अंमलबजावणी करायची.’

शमीने या सामन्यात 9.5 षटकात गोलंदाजी करताना 40 धावा देत 4 विकेट्स घेतल्या. तो विश्वचषकात हॅट्रिक घेणारा भारताचा दुसराच गोलंदाज आहे. याआधी 1987 च्या विश्वचषकात चेतन शर्मा यांनी पहिली हॅट्रिक घेतली होती.

क्रीडा क्षेत्रातील ताज्या घडामोडी, बातम्या, सदरे आणि विशेष लेखांसाठी लाईक करा महा स्पोर्ट्सचे फेसबुक पेज. आपणास व्हाॅट्सअपच्या माध्यमातून हे सर्व हवे असेल तर आम्हाला 9860265261 या व्हाॅट्सअप क्रमांकावर Join Maha असा मेसेज नक्की करा.

महत्त्वाच्या बातम्या –

२०१९ विश्वचषकात खेळाडूंचे झाले नाही एवढे होतेय या व्यक्तीचे कौतुक

विंडीज विरुद्ध शतकी खेळी करत केन विलियम्सनने केली रोहित-धवनच्या विक्रमाची बरोबरी

विराट कोहलीला आयसीसीने सुनावली मोठी शिक्षा, जाणून घ्या कारण