शांघाय ओपनच्या विजेतेपदासह फेडररने केले तब्बल १५ विक्रम

शांघाय । द्वितीय मानांकित रॉजर फेडररने अव्वल मानांकित स्पेनच्या राफेल नदालला रोलेक्स शांघाय मास्टर्स १००० मध्ये ६-४, ६-३ असे पराभूत केले. याबरोबर फेडररने यावर्षी ६व्या विजेतेपदाला गवसणी घातली.

या विजेतेपदासह फेडररने केलेले हे विक्रम…

-रॉजर फेडररचा एटीपी मास्टर्स स्पर्धेतील ३५०वा विजय आहे. हा विश्वविक्रम आहे.

-या वर्षी फेडरर आणि नदाल ४थ्यांदा समोरासमोर आले असून ऑस्ट्रेलियन ओपन, मियामी ओपन आणि बीएनपी पारिबास ओपन पाठोपाठ रोलेक्स शांघाय मास्टर्स १०००मध्येही फेडररने नदालला पराभूत केले आहे. तर सलग ५ सामन्यात फेडररने नदालला पराभूत केले आहे.

– फेडररचे हे एटीपी मास्टर्सचे २७वे विजेतेपद आहे. यादीत अव्वल स्थानी नदाल (३०) आणि जोकोविच (३०) आहेत.

– फेडरर नदाल आजपर्यंत ३८ वेळा समोरासमोर आले असून त्यात नदालने २३ तर फेडररने १५ सामने जिंकले आहेत. हार्ड कोर्टवरील १९ पैकी ११ लढती फेडररने तर नदालने ९ लढती जिंकल्या आहेत.

-रॉजर फेडररचा हा १४३ वा अंतिम फेरीचा सामना आहे. त्यात त्याने ९४ विजेतेपद मिळवली आहेत तर ४९वेळा तो उपविजेता ठरला आहे.

-शांघाय ओपनमधील फेडररची ही तिसरी अंतिम फेरी होती. ज्यात त्याने २ विजेतेपदं मिळवली आहेत तर एकवेळ तो उपविजेता राहिला आहे.

-या मोसमात फेडररने ६ विजेतेपदं मिळवली आहेत तर १ उपविजेपदही त्याच्या नावावर आहे.

-रॉजर फेडररचा हा हार्ड कोर्टवरील ७००वा विजय आहे.

-यावर्षी फेडररने २ ग्रँडस्लॅम, ३ एटीपी मास्टर्स १००० आणि १ एटीपी वर्ल्ड टूर ५०० जिंकली आहे.

-आजपर्यंत जोकोविच- नदाल हे ५०व्यांदा आमने-सामने आले आहे तर फेडरर-जोकोविच ४५वेळा आणि फेडरर-नदाल ३८वेळा आमने-सामने आले आहेत. कोणत्याही दोन खेळाडूंमधील हे विश्वविक्रम आहे.

-फेडररचे हे ९४वे विजेतेपद आहे. याबरोबर ओपन इरामध्ये सर्वाधिक विजेतेपद मिळवणाऱ्या खेळाडूंच्या यादीत तो इवान लेंडल यांच्याबरोबर दुसऱ्या स्थानावर आला आहे. पहिल्या स्थानावर जिमी कोंनॉर्स आहेत. त्यांनी १०९ विजेतेपद जिंकली आहेत.

-रॉजर फेडरर या मोसमात क्रमवारीत पहिल्या १० खेळाडूंमध्ये असलेल्या खेळाडूंकडून ११ पैकी केवळ एकदा पराभूत झाला आहे. त्याला रॉजर्स कप स्पर्धेत अलेक्झांडर झवेरवने पराभूत केले होते.

-२४ फायनल्समध्ये नदालने फेडररला १४ वेळा पराभूत केले आहे तर फेडररने नदालला १० वेळा पराभूत केले आहे.

-एटीपी मास्टर्स स्पर्धांच्या अंतिम फेरीत नदाल फेडरर १२ वेळा समोरासमोर आले आहेत ज्यात नदालने ७ तर फेडररने ५ विजतेपद मिळवली आहेत.

-नदालची ही शांघाय ओपनची दुसरी अंतिम फेरी होती.