१०० पेक्षा जास्त खराब रिओ ऑलिम्पिक पदकं परत

सावो पाउलो: २०१६ रिओ ऑलिम्पिकमध्ये १०० पेक्षा जास्त पदक खराब निघाल्यामुळे ती आयोजकांकडे परत करण्यात आली आहे. ही पदक एकतर गंजली आहेत किंवा त्यांच्यावर काळे डाग पडले आहेत. रिओ ऑलिम्पिकच्या प्रवक्त्याने शुक्रवारी हे माध्यमांना सांगितले आहेत.

जवळजवळ १३० पदकांपैकी बरीचशी पदके कांस्यपदके आहेत तर यातील काही पदके ही पॅराऑलिम्पिकमधील आहेत. चुकीच्या हाताळणीमुळे किंवा खाली पडल्यामुळे त्यांना काळे डाग पडले आहेत किंवा गंज चढला आहे. यातील बहुतेक पदकांच्या समस्या ब्राझिलियन कारखान्यात सोडवण्यात येत आहेत.

याबद्दल पहिली समस्या ही ऑक्टोबरमध्ये आली परंतु ती एक सामान्य गोष्ट असेल असे समजण्यात आले होते.

ब्राझिलियन कारखान्यात या सर्व पादकांवर लवकरात लवकर योग्य प्रक्रिया करून परत देण्यात येणार आहे.
रिओ ऑलिंपिक साठी तब्बल २४८८ पदक बनविण्यात आली होती. तर २५८८ पदक ही पॅराऑलिम्पिकसाठी बनविण्यात आली होती. कांस्यपदक आणि रौप्यपदक ही ३० % रिसायकल गोष्टींपासून बनविण्यात आली होती.
मुख्य म्हणजे २०२० साली टोकियो ऑलिम्पिकमध्ये होणारी सर्व पदके ही जुन्या मोबाइल फोन आणि रिसायकल वस्तूपासून बनवली जाणार आहेत.