अजिंक्य रहाणेची खेळी विराटच्या शतकी खेळीपेक्षा सरस?

डर्बन । भारत विरुद्ध दक्षिण आफ्रिका पहिल्या वनडे सामन्यात भारताने ६ विकेट्सने दक्षिण आफ्रिकेवर विजय मिळवला. यात भारताचा कर्णधार विराट कोहली आणि कसोटी उपकर्णधार अजिंक्य रहाणे यांनी अफलातून खेळी केल्या. आफ्रिकेकडूनही फाफ डुप्लेसीने शतकी खेळी केली. 

तरीही अजिंक्य रहाणेची खेळी ही अनेक अर्थांनी लक्षात राहणारी ठरली. अजिंक्य रहाणेने काल ८६ चेंडूत ७९ धावा करताना २ षटकार आणि ५ चौकार खेचले. 

चांगली कामगिरी करूनही सतत कसोटी आणि वनडे संघाचा नियमित सदस्य नसलेल्या रहाणेने आपणच चौथ्या क्रमांकाचे प्रबळ दावेदार आहोत हे काल पुन्हा एकदा दाखवून दिले. वनडेत चौथ्या क्रमांकावर येत गेल्या चार डावात त्याने ८७, ८९, ५० आणि ७९ धावांच्या खेळी केल्या आहेत तर गेल्या ५ डावात त्याने (५५, ७०, ५३, ६१ आणि ७९) अर्धशतकी खेळी केल्या आहेत. मास्टर ब्लास्टर सचिन तेंडुलकर आणि कर्णधार विराट कोहलीनंतर अशी कामगिरी करताना तो केवळ तिसरा भारतीय आहे. 

गेल्या ६ वनडे मालिकेत सतत संधी मिळेल तेव्हा चांगली कामगिरी करूनही त्याला संघात स्थान देण्यात आले नाही. विंडीज मालिकेत त्याला संघात स्थान देण्यात आल्यावर पुन्हा श्रीलंका संघाविरुद्ध खेळवण्यात आले नाही. त्यानंतर पुन्हा ऑस्ट्रेलियाविरुद्ध खेळलेल्या रहाणेला न्यूझीलँड आणि श्रीलंका विरुद्ध संघात स्थान देण्यात आले नाही. विशेष म्हणजे रहाणेने ऑस्ट्रेलिया विरुद्ध सलग ४ अर्धशतकी खेळी केल्या होत्या. 

भारतीय संघाला चौथ्या क्रमांकावरील खेळाडूची वनडेत नितांत गरज असतानाही आणि रहाणे चांगली कामगिरी करत असतानाही त्याला संघाच्या बाहेर ठेवले जाते. आजच्या खेळीने त्याने या मालिकेपुरता तरी हा प्रश्न निकाली काढला आहे. 

विशेष म्हणजे ही खेळी करताना कर्णधार विराट कोहली हा मैदानावर होता आणि तो त्याच्या ह्या जबरदस्त खेळीचा दुसऱ्या बाजूने आनंद घेत होता. रहाणेच्या एका फटक्याला तर कोहलीने खास दाद दिली. मिड ऑनकडे षटकार खेचणाऱ्या रहाणेने दुसऱ्याच चेंडूवर बाउन्सरला यष्टिरक्षकाच्या डोक्यावरून सीमारेषेपार धाडला, हा क्षण क्रिकेटप्रेमी विसरणे अवघडंच. 

आजपर्यंत याच डर्बनच्या मैदानावर भारतीय संघ कधीही विजयी झाला नाही. पराभूत झालेल्या गेल्या ३ सामन्यात भारतीय संघाने कमीतकमी १३० धावांनी हार पत्करली आहे. हे करताना त्यांना २७० ते २८० धावांचेही आव्हान पेलले नाही. म्हणजे भारताने त्या तीन सामन्यात जेमेतेम १५० धावांचा टप्पा पार केला आहे. 

आजही लक्ष काहीसे तसेच होते. आणि कर्णधार चांगला खेळत असताना त्याला साथ देणाऱ्या एका चांगल्या खेळाडूची गरज होती आणि ती गरज काल रहाणेने जबाबदारी घेऊन पूर्ण केली. तो बाद झाला तेव्हा संघाला ४४ चेंडूत १७ धावांची गरज होती. याचकारणामुळे रहाणेची खेळी अनेक अर्थांनी खास ठरली.