मोर्ने मॉर्केलने निवृत्तीच्या आधी कसोटी क्रिकेटमध्ये केला हा मोठा पराक्रम

दक्षिण आफ्रिका विरुद्ध ऑस्ट्रेलिया यांच्यात सुरु असलेल्या तिसऱ्या कसोटी सामन्यात दक्षिण आफ्रिकेचा वेगवान गोलंदाज मोर्ने मॉर्केलने आज त्याच्या कसोटी कारकिर्दीतील एक महत्वाचा टप्पा पार केला आहे.

त्याने आज ऑस्ट्रेलियाच्या शॉन मार्शला बाद करून कसोटी कारकिर्दीत ३०० विकेट्स घेण्याचा पराक्रम केला आहे. हा टप्पा पार करणारा तो दक्षिण आफ्रिकेचा पाचवा गोलंदाज ठरला आहे.

तसेच आज मॉर्केलने ऑस्ट्रलियाचे आत्तापर्यंत ३ विकेट्स घेतल्या आहेत. त्याने आज उस्मान ख्वाजा, स्टीव्ह स्मिथ आणि मार्शला बाद केले. या सामन्यात द आफ्रिकेने पहिल्या डावात सर्वबाद ३११ धावा केल्या आहेत. तर ऑस्ट्रेलिया सध्या खेळत आहे.

भारताविरुद्ध २००६ मध्ये आंतराष्ट्रीय पदार्पण करणाऱ्या मॉर्केलची ही कारकिर्दीतील शेवटची मालिका आहे. या ३३ वर्षीय खेळाडूने आफ्रिकेकडून ८३ कसोटी, ११७ वनडे आणि ४४ टी२० सामने खेळले आहेत.

विशेष म्हणजे मॉर्केलची कसोटी कारकिर्दीतील पहिली विकेट भारताचा माजी कर्णधार एमएस धोनी हा होता.

द आफ्रिका विरुद्ध ऑस्ट्रेलिया कसोटी मालिकेनंतर मॉर्केल सर्व प्रकारच्या क्रिकेटमधून निवृत्ती घेणार असल्याचे त्याने आधीच जाहीर केले होते. त्यामुळे कसोटी क्रिकेटमधील ३०० विकेट्स ही निवृत्तीच्या आधी त्याला मिळालेली सुखद भेट ठरली आहे.

दक्षिण आफ्रिकेकडून कसोटीत ३०० पेक्षा जास्त विकेट्स घेणारे गोलंदाज:

४२१ विकेट्स – शॉन पोलॉक
४१९ विकेट्स – डेल स्टेन
३९० विकेट्स – मखाया एनटिनी
३३० विकेट्स – अॅलन डोनाल्ड
३०० विकेट्स – मोर्ने मॉर्केल*