रोहित शर्माने अर्धशतक करत ख्रिस गेलला टाकले मागे

कोलंबो। भारत विरुद्ध बांग्लादेश यांच्यात सुरु असलेल्या निदाहास ट्रॉफीच्या अंतिम सामन्यात भारतासमोर बांग्लादेशने १६७ धावांचे आव्हान ठेवले आहे. या लक्ष्याचा पाठलाग करताना आज रोहित शर्माने शानदार अर्धशतक केले.

रोहितने आज ५६ धावा केल्या. त्याचे हे १४ वे अर्धशतक आहे. हे अर्धशतक करताना रोहितने विंडीजचा धडाकेबाज फलंदाज ख्रिस गेलला मागे टाकले आहे. आंतराष्ट्रीय टी २० मध्ये सर्वाधिक वेळा ५० पेक्षा जास्त धावा करण्याच्या यादीत रोहित आता दुसऱ्या क्रमांकावर आला आहे.

रोहितने आंतराष्ट्रीय टी २० मध्ये १६ वेळा ५० पेक्षा जास्त धावा केल्या आहेत. हा विक्रम करताना त्याने न्यूझीलंडचा फलंदाज मार्टिन गप्टिलची बरोबरी केली आहे. गप्टिलनेही आंतराष्ट्रीय टी २० मध्ये १६ वेळा अशी कामगिरी केली आहे.

या यादीत भारताचा कर्णधार विराट कोहली अव्वल स्थानी असून त्याने आंतराष्ट्रीय टी २० मध्ये १८ वेळा ५० पेक्षा जास्त धावा करण्याची कामगिरी केली आहे.

तसेच या यादीत न्यूझीलंडचा माजी कर्णधार ब्रेंडन मॅक्युलम आणि विंडीजचा गेल तिसऱ्या स्थानी असून त्यांनी १५ वेळा आंतराष्ट्रीय टी २० मध्ये अशी कामगिरी केली आहे.

आंतराष्ट्रीय टी २० मध्ये सर्वाधिक वेळा ५० पेक्षा जास्त धावा करणारे फलंदाज:

विराट कोहली – १८ वेळा
रोहित शर्मा आणि मार्टिन गप्टिल – १६ वेळा
ब्रेंडन मॅक्युलम आणि ख्रिस गेल – १५ वेळा