कर्णधार कोहलीने स्मिथचा तर विक्रम मोडलाच पण पॉटिंगचाही विक्रम आहे धोक्यात

पर्थ। भारताचा आॅस्ट्रेलिया विरुद्ध आॅप्टस स्टेडीयम, पर्थ येथे दुसरा कसोटी सामना सुरु आहे. या सामन्याचा आज तिसरा दिवस आहे. या सामन्यात भारताचा कर्णधार विराट कोहलीने पहिल्या डावात शतकी खेळी केली आहे. याबरोबरच त्याने अनेक विक्रमांनाही गवसणी घातली आहे.

विराटने आज  257 चेंडूत 123 धावा केल्या. या खेळीत त्याने 13 चौकार आणि 1 षटकार मारला. विराटने 214 चेंडूत त्याचे हे शतक पूर्ण केले असून हे त्याचे कसोटी क्रिकेटमधील 25 वे शतक आहे. हे शतक त्याने त्याच्या कसोटी क्रिकेट कारकिर्दीतील 127 व्या डावात पूर्ण केले आहे.

याचबरोबर हे शतक त्याचे कर्णधार म्हणून आंतरराष्ट्रीय क्रिकेटमधील 34 वे शतक ठरले आहे. त्यामुळे त्याने दक्षिण आफ्रिकेचा माजी कर्णधार ग्रॅमी स्मिथने कर्णधार म्हणून आंतरराष्ट्रीय क्रिकेटमध्ये  केलेल्या 33 शतकांच्या विक्रमाला मागे टाकले आहे.

तसेच कर्णधार म्हणून आंतरराष्ट्रीय क्रिकेटमध्ये सर्वाधिक शतके करण्याच्या यादीत विराट आता दुसऱ्या क्रमांकावर आला आहे. या यादीत अव्वल क्रमांकावर आॅस्ट्रेलियाचा दिग्गज कर्णधार रिकी पॉटिग असून त्याने कर्णधार म्हणून आंतरराष्ट्रीय क्रिकेटमध्ये 41 शतके केली आहेत.

विराटला आज पॅट कमिन्सने 93 व्या षटकात बाद केले. त्याचा झेल दुसऱ्या स्लीपमध्ये असणाऱ्या पिटर हँड्सकॉम्बने चेंडू खूप खाली असताना घेतल्याने निर्णय तिसऱ्या पंचाकडे गेला होता. परंतू त्यांनाही याचा निर्णय न घेता आल्याने मैदानावरील पंचाचा निर्णयच योग्य ठरवण्यात आल्याने विराट बाद झाला.

या सामन्यात भारताने तिसऱ्या दिवसाच्या पहिल्या सत्रात पहिल्या डावात 7 बाद 252 धावा केल्या आहेत. तसेच पहिल्या सत्राखेर रिषभ पंत नाबाद 14 धावांवर खेळत आहे.

आंतराष्ट्रीय क्रिकेटमध्ये सर्वाधिक शतके करणारे कर्णधार-

41 – रिकी पॉटिंग

34 – विराट कोहली

33 – ग्रॅमी स्मिथ

20 – स्टीव्ह स्मिथ

19 – मायकल क्लार्क

महत्त्वाच्या बातम्या-

भारतीय क्रिकेटचे शापित शिलेदार: भाग १८ – उपेक्षित गुणवंत..

रनमशीन विराट कोहली ठरला तेंडुलकर, गावसकरांनाही वरचढ, केला हा मोठा पराक्रम

मी विराटचा आदर करतो, माझ्या ट्विटचा चुकीचा अर्थ घेतला गेला, स्टोक्सने दिले स्पष्टीकरण

गौतमचा प्रशिक्षक रवी शास्त्रींवर ‘गंभीर’ निशाणा

अबब…सहा सामन्यांतच या गोलंदाजाने घेतल्या २९ विकेट्स !