अखेर धोनीच्या नावासमोर ५०० हा क्रमांक आलाच

पोर्ट एलिझाबेथ । भारताने पाचव्या वनडे सामन्यात दक्षिण आफ्रिकेला ७३ धावांनी पराभूत करत मालिकेत ४-१ अशी आघाडी घेतली. तसेच तब्बल २५ वर्षांनी दक्षिण आफ्रिकेत वनडे मालिकेत विजय मिळवला.

भारताचा माजी कर्णधार एमएस धोनीला या मालिकेत फलंदाजीत विषे अशी कामगिरी करता आली नाही. ४ सामन्यात ३४.५०च्या सरासरीने त्याने केवळ ६९ धावा केल्या आहेत. परंतु धोनीने यष्टींमागे अनेक विक्रम या मालिकेत केले आहे.

लिस्ट अ प्रकारच्या (अ दर्जाच्या क्रिकेटमध्ये ) क्रिकेटमध्ये काल त्याने यष्टींमागे ५०० बळी घेण्याचा विक्रम केला. लीस्ट अ क्रिकेट म्हणजेच १ दिवसांच्या क्रिकेटमध्ये त्याला ही कामगिरी करता आली आहे. यात आंतरराष्ट्रीय आणि देशांतगर्त क्रिकेटच्या सामन्यांचा समावेश आहे. यात १२५ स्टंपिंग आणि ३७७ झेलांचा समावेश आहे.

अशी कामगिरी करणारा तो जगातील केवळ ८ वा यष्टीरक्षक आहे. विशेष म्हणजे धोनीने प्रथम श्रेणी क्रिकेटमध्येही यष्टींमागे ४२१ बळी घेतले आहेत.

तिसऱ्या वनडे सामन्यात यष्टींमागे वनडेत ४०० विकेट्स घेणारा धोनी चौथा खेळाडू बनला आहे. धोनीने जेव्हा विजेच्या चपळाईने १७व्या षटकात दक्षिण आफ्रिकेच्या एडिन मार्करमला यष्टिचित केले तेव्हा तो धोनीचा वनडेतील ४००वी शिकार ठरला.

धोनीने ३१७ सामन्यात आजपर्यंत ४०३ खेळाडूंना यष्टींमागे बाद केले आहे. या यादीत अव्वल स्थानी कुमार संगकारा असून त्याने ४०४ सामन्यात ४८२ खेळाडूंना बाद केले आहे तर दुसऱ्या स्थानावरील ऍडम गिलख्रिस्टने २८७ सामन्यात ४७२ फलंदाजांना तर तिसऱ्या क्रमांकावरील मार्क बाऊचरने २९५ सामन्यात ४२४ फलंदाजांना बाद केले आहे.

अ दर्जाच्या क्रिकेटमध्ये यष्टीपाठीमागे सर्वाधिक बळी घेणारे खेळाडू:
६६०- स्टिव्ह र्होडस
५९८- कुमार संगकारा
५९०- ऍडम गिलख्रिस्ट
५६२- जॅक रुसेल
५२७- पॉल निक्सन
५११-मार्क बाऊचर
५०१- एमएस धोनी