आणि फक्त ५० धावांनी विराटचा क्रिकेटच्या इतिहासातील सर्वात मोठा विक्रम हुकला

दिल्ली । येथे सुरु असलेल्या भारत विरुद्ध श्रीलंका तिसऱ्या आणि शेवटच्या कसोटी सामन्यात कर्णधार विराट कोहलीने अर्धशतकी खेळी करताना श्रीलंका संघाविरुद्ध मोठी धावसंख्या उभारण्यास मदत केली.

परंतु कर्णधार कोहलीचा तरीही एक विक्रम अगदी थोडक्यात हुकला. एका वर्षात आंतरराष्ट्रीय क्रिकेटमध्ये सर्वाधिक धावा करण्याचा विक्रम हा श्रीलंकेच्या कुमार संगकाराच्या नावावर आहे. त्याने २०१४मध्ये ४८ सामन्यात ५३.११च्या सरासरीने तब्बल २८६८ धावा केल्या होत्या. एका वर्षांत क्रिकेटच्या इतिहासात केलेल्या या सर्वाधिक धावा आहेत.

हा विक्रम मोडण्यासाठी विराटला केवळ ५० धावांची गरज होती. परंतु दिल्ली कसोटीत तो ५० धावांवर बाद झाला आणि तो विक्रम अबाधित राहिला.

२०१७मध्ये जबरदस्त फॉर्मात असणाऱ्या विराटने यावर्षी ४६ सामन्यात खेळताना ६८.७३च्या सरासरीने तब्बल २८१८ धावा केल्या आहेत. विशेष म्हणजे विराटचा हा यावर्षीचा शेवटचा सामना आहे. श्रीलंका संघाविरुद्ध तो वनडे आणि टी२० मालिकेत भाग घेणार नाही. त्यामुळे हा विक्रम आता संगकाराच्याच नावावर कायम राहील.

एका वर्षात आंतरराष्ट्रीय क्रिकेटमध्ये सर्वाधिक धावा करणारे खेळाडू
२८६८ कुमार संगकारा (वर्ष-२०१४, सामने-४८)
२८३३ रिकी पॉन्टिंग (वर्ष-२००५, सामने-४६)
२८१८ विराट कोहली (वर्ष-२०१७, सामने-४६)
२६९२ केन विल्यमसन (वर्ष-२०१५, सामने-३९)