कोहली, गंभीरला जे जमले नाही ते धोनीने ३७व्या वयात करून दाखवले

बेंगलोर | भारतीय संघाचा माजी कर्णधार आणि चेन्नई सुपर किंग्जचा स्टार कर्णधार एमएस धोनीने काल आपल्या संघाला आयपीएलमध्ये एकहाती सामना जिंकून दिला. अगदी शेवटपर्यंत मैदानावर रहात त्याने षटकार खेचून विजय साकारला. 

याबरोबर त्याने असा एक विक्रम केला आहे जो जगात आजपर्यंत कुणालाही जमला नाही. त्याने कर्णधार म्हणून टी२०मध्ये ५००० धावांचा टप्पा पार केला आहे. 

अशी कामगिरी करणारा तो जगातील एकमेव खेळाडू आहे. त्याने आजपर्यंत टी२०मध्ये भारत, चेन्नई सुपर किंग्ज, इंडियन्स तसेच रायझिंग पुणे सुपर जायंटचे नेतृत्व केले आहे. 

२४४ सामन्यात कर्णधार म्हणून त्याने आजपर्यंत ५०१० धावा केल्या आहेत . या सामन्यात संघाला १४३ विजय आणि ९६ पराभव पहावे लागले आहे तर २ सामने टाय झाले असून ३ सामन्यात कोणताही निकाल लागला नाही. 

विशेष म्हणजे या प्रकारात २०० किंवा त्यापेक्षा अधिक सामन्यात तो नेतृत्व करणारा जगातील पहिलाच खेळाडू आहे. 

कर्णधार म्हणून सर्वाधिक धावा करणाऱ्या खेळाडूंच्या यादीत धोनीनंतर गौतम गंभीर (४२४२ धावा) आणि विराट कोहली (३५९१ धावा ) हे खेळाडू आहेत.