भारताविरुद्ध अर्धशतकी खेळीबरोबरच कर्णधार विलियम्सनने केली एका विश्वविक्रमाची बरोबरी

मँचेस्टर। आज(9 जूलै) 2019 विश्वचषकात भारत विरुद्ध न्यूझीलंड संघात पहिला उपांत्य सामना ओल्ड ट्रॅफर्ड मैदानावर सुरु आहे. या सामन्यात पावसाचा व्यत्यय येण्याआधी न्यूझीलंडने 46.1 षटकात 5 बाद 211 धावा केल्या आहेत.

न्यूझीलंडकडून कर्णधार केन विलियम्सनने 95 चेंडूत 67 धावा केल्या आहेत. याबरोबरच त्याने एका खास विश्वविक्रमाशी बरोबरी केली आहे. विलियम्सनने या विश्वचषकात 8 डावात 91.33 च्या सरासरीने 548 धावा केल्या आहेत. त्यामुळे त्याने एका विश्वचषकात कर्णधार म्हणून सर्वाधिक धावा करण्याच्या माहेला जयवर्धनेच्या विश्वविक्रमाशी बरोबरी केली आहे.

जयवर्धनेने 2007 च्या विश्वचषकात श्रीलंकेचे नेतृत्व करताना 11 डावात 60.88 च्या सरासरीने 548 धावा केल्या होत्या.

आजच्या सामन्यात न्यूझीलंडने नाणेफेक जिंकून प्रथम फलंदाजी करण्याचा निर्णय घेतला होता. पण भारताच्या गोलंदाजांनी टिचून गोलंदाजी करत न्यूझीलंडच्या फलंदाजांना मोठ्या धावा करण्यापासून रोखले आहे.

न्यूझीलंडकडून विलियम्सनव्यतिरिक्त रॉस टेलरने नाबाद 67 धावा केल्या आहेत. पावसाचा व्यत्यय आला त्यावेळी टेलरबरोबर टॉम लॅथम 3 धावांवर नाबाद खेळत आहे. न्यूझीलंडच्या अन्य फलंदाजांपैकी मार्टिन गप्टिल, हेन्री निकोल्स, जेम्स निशाम आणि कॉलिन डी ग्रँडहोमने स्वस्तात विकेट गमावल्या.

भारताकडून भुवनेश्वर कुमार, जसप्रीत बुमराह, हार्दिक पंड्या, रविंद्र जडेजा आणि युजवेंद्र चहलने प्रत्येकी 1 विकेट घेतली आहे.

एका विश्वचषकात सर्वाधिक धावा करणारे कर्णधार-

548 – माहेला जयवर्धने, 2007

548 – केन विलीयम्स, 2019

539 – रिकी पाॅटींग, 2003

507 – एराॅन फिंच, 2019

482 – एबी डिव्हीलियर्स, 2015

क्रीडा क्षेत्रातील ताज्या घडामोडी, बातम्या, सदरे आणि विशेष लेखांसाठी लाईक करा महा स्पोर्ट्सचे फेसबुक पेज. आपणास व्हाॅट्सअपच्या माध्यमातून हे सर्व हवे असेल तर आम्हाला 9860265261 या व्हाॅट्सअप क्रमांकावर Join Maha असा मेसेज नक्की करा.

महत्त्वाच्या बातम्या –

११ वर्षांनंतर रविंद्र जडेजाच्या बाबतीत झाला हा खास योगायोग

असा पराक्रम करणारा एमएस धोनी दुसराच यष्टीरक्षक

हिटमॅन रोहित शर्माला हे तीन खास विक्रम करण्याची आज आहे सुवर्णसंधी