फक्त सचिनचेच नाही तर द्रविडचेही विक्रम मोडतोय विराट

मेलबर्न। भारताचा मेलबर्न क्रिकेट ग्राउंडवर ऑस्ट्रेलियाविरुद्ध सुरु असलेल्या तिसऱ्या कसोटी सामन्याचा आज(27 डिसेंबर) दुसरा दिवस आहे. या दिवसाची सुरुवात भारताचा कर्णधार विराट कोहली आणि चेतेश्वर पुजाराने चांगली केली होती.

आज 2 बाद 215 धावांपासून पुढे खेळताना त्यांनी पहिल्या सत्रात एकही विकेट गमावली नाही. मात्र दुसऱ्या सत्रात विराटला 82 धावांवर असताना बाद करण्यात ऑस्ट्रेलियाचा वेगवान गोलंदाज मिशेल स्टार्कला यश आले. विराटचा झेल थर्डमॅनला उभ्या असणाऱ्या ऍरॉन फिंचने घेतला.

असे असले तरी विराटने एक खास विक्रम करत द्रविडला मागे टाकले आहे. विराटने यावर्षी परदेशात 11 कसोटी सामने खेळताना 21 डावात 1138 धावा केल्या आहेत.

त्यामुळे त्याने भारताकडून एका वर्षात परदेशात सर्वाधिक कसोटी धावा करण्याच्या राहुल द्रविडच्या विक्रमाला मागे टाकले आहे. द्रविडने 2002 मध्ये परदेशात 11 कसोटी सामन्यातील 18 धावांत 1137 धावा केल्या होत्या.

याबरोबरच कसोटीमध्ये एका वर्षात परदेशात खेळताना सर्वाधिक धावा करण्याच्या जागतिक यादीतही विराटने द्रविडला मागे टाकत तिसरा क्रमांक मिळवला आहे.

या यादीत अव्वल क्रमांकावर दक्षिण आफ्रिकेचा माजी कर्णधार ग्रॅमी स्मिथ आहे. स्मिथने 2008 मध्ये परदेशात कसोटीमध्ये 1212 धावा केल्या होत्या. तर या यादीत दुसऱ्या क्रमांकावर सर विवियन रिचर्ड्स आहेत. त्यांनी 1976 मध्ये 7 सामन्यात 1154 कसोटी धावा परदेशात केल्या होत्या.

या यादीत अव्वल क्रमांकावर येण्याची विराटला अजूनही संधी आहे. त्याने जर मेलबर्न कसोटीमध्ये दुसऱ्या डावात 75 धावा केल्या तर तो या यादीत स्मिथला मागे टाकू शकतो.

 एका वर्षात परदेशात सर्वाधिक कसोटी धावा करणारे फलंदाज – 

1212 – ग्रॅमी स्मिथ (2008)

1154 – सर विवियन रिचर्ड्स (1976)

1138 – विराट कोहली (2018)

1137 – राहुल द्रविड (2002)

1065 – मोहिंदर अमरनाथ (1983)

1061 – अॅलिस्टर कूक (2010)

महत्त्वाच्या बातम्या:

ऑस्ट्रेलियन समालोचकांकडून आजचा हिरो ‘मयांक अगरवाल’चा मोठा अपमान

जेव्हा खेळाडू नाही तर प्रेक्षकच करतात कसोटी सामन्यात विक्रम

मयंक अगरवाल असा पराक्रम करणारा केवळ पाचवा भारतीय सलामीवीर फलंदाज