दक्षिण आफ्रिका, इंग्लंड नंतर ऑस्ट्रेलियातही विराट कोहलीचा शतकाचा धडाका सुरूच

पर्थ। आॅस्ट्रेलिया विरुद्ध भारत  संघात आॅप्टस स्टेडीयम, पर्थ येथे दुसरा कसोटी सामना सुरु आहे. या सामन्याचा आज (16 डिसेंबर) तिसरा दिवस असून भारताचा पहिला डाव 283 धावांत संपुष्टात आला. तर ऑस्ट्रेलिया 43 धावांनी आघाडीवर आहे.

या सामन्यात भारताचा कर्णधार विराट कोहलीने पहिल्या डावात शतकी खेळी केली आहे. त्याबरोबरच कोहलीने अनेक विक्रमही आपल्या नावावर केले आहेत.

विराटने आज 257 चेंडूत 123 धावा केल्या. या खेळीत त्याने 13 चौकार आणि 1 षटकार मारला. विराटने 214 चेंडूत त्याचे हे शतक पूर्ण केले असून हे त्याचे कसोटी क्रिकेटमधील 25 वे शतक आहे.

याबरोबरच 2018 या वर्षात विराटने दक्षिण आफ्रिका, इंग्लंड आणि आता आॅस्ट्रेलियातही कसोटी शतक केले आहे. यामुळे या तीन देशात त्याचे एकूण 10 कसोटी शतके झाली असून हा विक्रम करताना त्याने राहुल द्रविड आणि सुनिल गावसकर यांना मागे टाकले आहे.

विराटने ही 10 शतके 49 डावात केली आहे. दक्षिण आफ्रिका, इंग्लंड आणि आॅस्ट्रेलिया या तीन देशात द्रविडने 75 डावात 8 आणि गावसकर यांनी 47 डावात 7 शतके केली होती. सचिन तेंडुलकर हा या तीन देशांमध्ये सर्वाधिक 15 शतके करत आघाडीवर आहे. त्याने 96 डावांमध्ये ही शतके केली आहेत.

तसेच विराट एकाच वर्षात दक्षिण आफ्रिका, इंग्लंड आणि आॅस्ट्रेलिया या देशात कसोटीमध्ये शतके करणारा पहिला आशियाई फलंदाज बनला आहे.

महत्त्वाच्या बातम्या:

किंग कोहली बनला असा भीमपराक्रम करणारा पहिलाच आशियाई फलंदाज

कर्णधार कोहलीने स्मिथचा तर विक्रम मोडलाच पण पॉटिंगचाही विक्रम आहे धोक्यात

रनमशीन विराट कोहली ठरला तेंडुलकर, गावसकरांनाही वरचढ, केला हा मोठा पराक्रम