कर्णधार विराट कोहली दिग्गजांच्या यादीत सामील

पोर्ट एलिझाबेथ । भारताने पाचव्या वनडे सामन्यात दक्षिण आफ्रिकेला ७३ धावांनी पराभूत करत मालिकेत ४-१ अशी आघाडी घेतली. तसेच तब्बल २५ वर्षांनी दक्षिण आफ्रिकेत वनडे मालिकेत विजय मिळवला.

या विजयात कर्णधार विराट कोहलीचे फलंदाजीमधील यश हे नजरेत भरणारे आहे. त्याने ५ सामन्यात १४३च्या सरासरीने तब्बल ४२९ धावा केल्या आहेत.

परंतु कर्णधार म्हणूनही तो वनडेत असे काही विक्रम करत आहे जे अनेक अर्थांनी खास आहेत. त्यातील सर्वात खास विक्रम म्हणजे त्याने ४८ वनडे कर्णधार म्हणून ३७ विजय मिळवले आहेत. यापूर्वी पहिल्या ४८ वनडेत अशी कामगिरी केवळ क्लीव्ह लॉईड, हॅन्सी क्रोनिए आणि रिकी पॉन्टिंगला करता आली आहे.

विराटने ज्या ४८ वनडेत भारताचं नेतृत्व केलं आहे त्यात ३७ विजय, १० पराभव आणि १ सामना अनिर्णित अशी त्याची कामगिरी राहिली आहे.