कर्णधार रोहित शर्मानेही केला विराट कोहली प्रमाणे मोठा पराक्रम

चेन्नई। भारत विरुद्ध विंडीज संघात रविवारी तिसरा टी20 सामना पार पडला. या सामन्यात भारताने विंडीजवर 6 विकेट्सने विजय मिळवत 3 सामन्यांची टी20 मालिका 3-0 ने जिंकली. या विजयाबरोबर भारताचा प्रभारी कर्णधार रोहित शर्माच्या नावावर एक खास विक्रम नोंदवला गेला आहे.

रोहितचा हा भारताचा कर्णधार म्हणून 12 वा टी20 सामना होता तर 11 वा टी20 विजय होता. त्यामुळे त्याने भारताचा नियमित कर्णधार विराट कोहलीने मिळवलेल्या 11 टी20 विजयांची बरोबरी केली आहे.

विराटने आत्तापर्यंत भारताचे 17 टी20 सामन्यात नेतृत्व केले आहे. त्यातील 11 सामन्यात भारताला विजय मिळवता आला आहे. तसेच 6 सामन्यात पराभव स्विकारावा लागला आहे.

भारताचा कर्णधार म्हणून सर्वाधिक टी20 विजय हे माजी कर्णधार एमएस धोनीने मिळवले आहेत. त्याने 72 टी20 सामन्यात भारताचे कर्णधारपद सांभाळताना 41 विजय, 28 पराभव मिळवले आहेत. तसेच 2 सामन्यांचा निकाल लागलेला नाही तर 1 सामना बरोबरीत सुटला आहे.

याबरोबरच कर्णधार म्हणून सलग 12 आंतरराष्ट्रीय सामन्यात विजय मिळवण्याच्या विराटच्या विक्रमाशीही रोहितने बरोबरी केली आहे. त्याचा रविवारी विंडीज विरुद्ध मिळवलेला विजय हा कर्णधार म्हणून सलग 12 वा आंतरराष्ट्रीय सामन्यातील विजय होता.

भारताचा कर्णधार म्हणून सर्वाधिक सलग आंतरराष्ट्रीय सामन्यात विजय मिळवण्याचा विक्रम विराटच्या नावावर होता. पण आता रोहितनेही असा पराक्रम केला आहे.

भारतीय कर्णधार म्हणून सर्वाधिक टी20 सामन्यात विजय मिळवणारे खेळाडू:

41 विजय – एमएस धोनी (72 सामने)

11 विजय – रोहित शर्मा (12 सामने)

11 विजय – विराट कोहली (17 सामने)

भारताचा कर्णधार म्हणून सर्वाधिक सलग आंतरराष्ट्रीय सामन्यात विजय मिळवणारे खेळाडू:

12 – रोहित शर्मा

12 – विराट कोहली

9 – एमएस धोनी

महत्त्वाच्या बातम्या:

शेवटच्या चेंडूवर विजय मिळवत टीम इंडियाचा विंडीजला व्हाइटवॉश

चारच धावा केल्या तरी कर्णधार रोहित शर्माने केला हा खास विक्रम

भारतीय क्रिकेटचे शापित शिलेदार: भाग १४- परिपूर्णतेचा ध्यास घेतलेला शापित