खासदार सचिन…

क्रिकेटचा देव अर्थात मास्टर ब्लास्टर सचिन तेंडुलकर. सचिनचे अनेकविध पैलू आपल्याला ज्ञात आहेतच, त्यापैकीच एक म्हणजे खासदार सचिन. क्रिकेटच्या मैदानावरील बादशाह असणाऱ्या सचिनची तत्कालीन यूपीए सरकारतर्फे २०१२ साली  राज्यसभेच्या नामनिर्देशित सदस्यांमध्ये नियुक्ती करण्यात आली. वास्तविक सचिनची राज्यसभेवर नियुक्ती करणे ही सोपी गोष्ट नव्हती. साहित्य, कला, विज्ञान, समाजसेवा या क्षेत्रांतील नावाजलेल्या व्यक्तींची राष्ट्रपती राज्यसभेवर नियुक्ती करतात. सचिनची नियुक्ती होईपर्यंत यामध्ये क्रीडा क्षेत्राचा समावेश नव्हता. सचिनची नियुक्ती करण्यासाठी सरकारने खास यामध्ये बदल करून क्रीडा क्षेत्राचा त्यामध्ये समावेश केला. सरकारप्रमाणेच संसदेतल्या त्याच्या सहकाऱ्यांनीदेखील त्याला त्याचे शतकांचे शतक झाल्यानंतर राज्यसभेतील १०० क्रमांकाचे आसन सन्मानपूर्वक बहाल केले होते.

 

दुर्दैवाने सचिनने आपल्याला मिळालेल्या खास संधीचा तितकासा उपयोग केला नाही असेच म्हणावे लागेल. सचिनची गेल्या पाच वर्षांतील राज्यसभेतील  कामगिरी अतिशय निराशाजनक अशीच होती. मैदानावर चमकदार करणारा सचिन आपल्या संसदीय कारकीर्दीत मात्र सपशेल अपयशी ठरला असेच म्हणावे लागेल. संसदेच्या नुकत्याच प्रसिद्ध झालेल्या एका अहवालानुसार सचिनची राज्यसभेतील उपस्थिती अतिशय कमी राहिली आहे. त्याने राज्यसभेतील प्रश्नोत्तारांमध्येही खूपच कमी वेळा सहभाग घेतला आहे. त्याने राज्यसभेतील आपला पहिला प्रश्न नियुक्ती झाल्यानंतर ३ वर्षांनी म्हणजेच २०१५ साली विचारला हे याचेच द्योतक आहे.

 

पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्या महत्त्वाकांक्षी ‘सांसद आदर्श ग्राम’ योजनेअंतर्गत सचिनने उस्मानाबाद जिल्ह्यातील डोणजा हे गाव दत्तक घेतले आहे. मराठवाड्यातील दुष्काळी भागातील हे गाव दत्तक घेऊन त्याने आपले मागास भागाकडेही लक्ष असल्याचे दाखवून दिले आहे. या गावाच्या उत्थानासाठी आपल्या खासदार फंडातून सचिन सर्वतोपरी मदत करत असतो. सर्वच दृष्टीने वंचित असणाऱ्या या गावासाठी सचिन येत्या एका वर्षाच्या काळात कोणत्या योजना राबवतो हे पाहणे रंजक ठरेल.

 

राज्यसभेतील सचिनची कामगिरी जरी निराशाजनक असली तरी सचिन सामाजिक कामांमध्येदेखील कायमच हिरीरीने सहभाग घेत असतो. तो अनेक संस्थांना सढळहाताने मदत करत असतो, अनेक सामाजिक उपक्रमांमध्ये सहभाग घेत असतो. तर अशा या खासदार सचिनला वाढदिवसाच्या मनःपूर्वक शुभेच्छा. मैदानावरील कामगिरीप्रमाणेच सचिनची सामाजिक कामगिरीदेखील चमकदार होत राहो हीच सदिच्छा…

लेखक- अजिंक्य गटणे
( ई-मेल- [email protected] )

(टीप: लेखातील मते ही लेखकाची वैयक्तिक मते आहे. महा स्पोर्ट्स सर्व मुद्द्यांशी सहमतच असेल असे नाही.)