२१ वर्षीय फलंदाजाने रणजी ट्राॅफीत असा काही कारनामा केली ज्याचा आपण फक्त विचारच केलेला बरा

इंदोर। रणजी ट्रॉफी 2018-19 स्पर्धेत मध्यप्रदेश विरुद्ध हैद्राबाद  संघात सुरु असलेल्या सामन्यात आज मध्यप्रदेशच्या 21 वर्षीय अजय रोहराने एक खास विश्वविक्रम केला आहे.

हा सामना अजयचा प्रथम श्रेणी क्रिकेटचा पदार्पणचा सामना आहे. त्याने पदार्पणाच्या सामन्यातच पहिल्या डावात नाबाद 267 धावांची द्विशतकी खेळी केली आहे. त्यामुळे त्याने प्रथम श्रेणी क्रिकेटमध्ये पदार्पणाच्या सामन्यात सर्वोत्तम वैयक्तिक धावसंख्या करण्याचा विश्वविक्रम केला आहे.

हा विक्रम करताना त्याने मुंबईच्या अमोल मुजुमदार यांचा 25 वर्षांचा जूना विक्रम मोडला आहे. मुजुमदार यांनी 1993/94 च्या मोसमात हरियाणा विरुद्ध प्रथम श्रेणी क्रिकेटमध्ये पदार्पण करताना 260 धावांची खेळी केली होती.

रोहराने या सामन्यात 345 चेंडूंचा सामना करताना नाबाद 267 धावांची खेळी केली आहे. यात त्याने 21 चौकार 5 षटकार मारले. तो या सामन्यात काल दुसऱ्या दिवसाखेर 255 धावांवर नाबाद होता. त्यामुळे त्याने आज तिसऱ्या दिवशी हा विक्रम पूर्ण केला.

त्यानंतर काहीवेळातच मध्यप्रदेशने रोहरा 267 आणि यश दुबे 139 धावांवर नाबाद असताना त्यांचा पहिला डाव 4 बाद 562 धावांवर घोषित केला आणि पहिल्या डावात तब्बल 438 धावांची आघाडी घेतली आहे.

हा सामना खेळण्याआधी रोहराने फक्त 2 अ दर्जाचे सामने खेळले आहेत. तसेच 23 वर्षांखालील सीके नायडू ट्रॉफीमध्ये त्याने पाच सामन्यात 61.57 च्या सरासरीने 431 धावा केल्या आहेत.

विशेष म्हणजे रोहराने आज केलेला हा विक्रम काल मणिपूरकडून नागालँड विरुद्ध प्रथम श्रेणीमध्ये पदार्पण करणाऱ्या मयांक राघवलाही करण्याची संधी होती. पण तो 228 धावांवर बाद झाला.

प्रथम श्रेणी क्रिकेटमध्ये पदार्पणाच्या सामन्यात सर्वोत्तम वैयक्तिक खेळी करणारे क्रिकेटपटू-

267* – अजय रोहरा (2018/19)

260 – अमोल मुजुमदार (1993/94)

256* – बहिन शहा (2017/18)

240 – एरिक मार्क्स ट्रान्सवल (1920/21)

232* – सॅम लोक्सटॉन (1946/47)

230 – गुंडप्पा विश्वनाथ (1967/68)

महत्त्वाच्या बातम्या:

आॅस्ट्रेलिया विरुद्ध भारत: तिसऱ्या दिवसाखेर भारताकडे १६६ धावांची आघाडी

विराट कोहलीची कसोटीमध्ये या गोलंदाजाने केली आहे सर्वाधिक वेळा शिकार

असा पराक्रम करणारा कोहली ठरला केवळ चौथा भारतीय

भारताच्या या बॅडमिंटनपटूचे मतदार यादीतून नाव झाले गायब