धोनीने रणजी ट्रॉफी खेळणे म्हणजे युवा खेळाडूची संधी हुकणे!

भारतीय क्रिकेट संघाचा माजी कर्णधार एमएस धोनीने झारखंडकडून रणजी ट्रॉफी खेळावी अशी सध्या भारतीय क्रिकेट वर्तुळात चर्चा आहे. पण झारखंड संघाचे प्रशिक्षक राजीव कुमार यांनी म्हटले आहे की जर धोनी रणजी ट्रॉफीमध्ये खेळला तर युवा खेळाडूंना बाहेर बसावे लागेल.

हिंदुस्थान टाइम्सशी बोलताना राजीव म्हणाले, की झारखंडकडून चार दिवसीय सामने धोनी न खेळणे ही गोष्ट समजण्यासारखी आहे. तसेच राजीव म्हणाले धोनी जेव्हाही रांचीमध्ये असतो, तेव्हा तो सराव सत्रामध्ये सहभागी होतो आणि युवा खेळाडूंशीही संवाद साधतो.

राजीव यांनी सांगितले आहे की, ‘धोनीच्या झारखंडकडून न खेळण्याच्या चर्चा आहेत. पण तूम्ही समजायला हवे की त्याचे संघात येणे म्हणजे कोणालातरी बाहेर बसावे लागेल. तूम्हाला असे वाटते का की धोनीला असे हवे असेल? त्याचबरोबर हे देखील समजणे गरजेचे आहे की संघातील युवा खेळाडू मिळालेल्या प्रत्येक संधीचा उपयोग करण्यासाठी धडपडत आहेत आणि त्यात जर धोनी चार दिवसीय सामने खेळणार असेल तर ते योग्य ठरणार नाही.’

‘तो(धोनी) जेव्हाही रांचीमध्ये असतो तेव्हा सरावाच्यावेळी खेळाडूंना मदत करण्यासाठी येतो. मला वाटते युवा खेळाडूंसाठी ते जास्त महत्त्वाचे आहे. युवा खेळाडू त्याला पाहुन आणि त्याच्याबरोबर वेळ घालवून स्वत:मध्ये आणि विचारांध्ये बदल घडवू शकतात.’

धोनीला विंडीज आणि आॅस्ट्रेलिया विरुद्धच्या टी20 मालिकेसाठी भारतीय संघातून वगळण्यात आले होते. तसेच त्याने डिसेंबर 2014ला कसोटीतून निवृत्ती घेतली आहे. त्यामुळे त्याच्याकडे विश्रांतीसाठी भरपूर वेळ होता. त्याने या वेळात रणजी ट्रॉफी स्पर्धा खेळावी असे भारताचे माजी दिग्गज फलंदाज सुनील गावसकर यांनी सुचवले होते.

पण आता झारखंडचेच प्रशिक्षक राजीव कुमार यांनी धोनीने रणजी ट्रॉफी न खेळण्याच्या निर्णयाला पाठींबा दिला आहे.

झारखंड रणजी ट्रॉफीमध्ये सध्या क गटातून खेळत असून ते तीन विजयांसह तिसऱ्या क्रमांकावर आहेत. त्यांनी 6 सामन्यात 1 पराभव स्विकारला असून त्यांचे 2 सामने अनिर्णित राहिले आहेत. त्यांच्यापुढे अव्वल क्रमांकावर 34 गुणांसह राजस्थान आहे. तर दुसऱ्या क्रमांकावर 25 गुणांसह उत्तर प्रदेश आहे. झारखंडचे 24 गुण आहेत. त्यामुळे ते बाद फेरीत प्रवेश करण्यासाठी भक्कम स्थितीत आहेत.

महत्त्वाच्या बातम्या:

भारताचे माजी सलामीवीर फलंदाज झाले भारतीय महिला संघाचे प्रशिक्षक

मी आयपीएलमध्ये एवढाही काही वाईट खेळलो नाही- जयदेव उनाडकट