धोनीवर टीका करण्याआधी धोनीची २०१८मधील कामगिरी नक्की पहा

सध्या भारतीय क्रिकेटमध्ये धोनी नावाच वादळ थंडावत असुन विराट कोहली नावाच्या वादळाने गेल्या काही वर्षात तुफान वेग पकडला आहे. एकवेळ भारतीय क्रिकेटमध्ये फक्त धोनी आणि धोनी असेच समीकरण असताना हा केंद्रबिंदु विराट कोहली नावाजवळ कधी गेला ते समजलंच नाही. हे अगदी क्रिकेटमध्ये पुर्वापार चालत आल आहे. जुन्या हिरोच्या शेवटच्या दिवसांत त्याला तोडीचा कुणीतरी हिरो तयार झालेला असतो. भारतीय क्रिकेट तर यात इतके सुदैवी आहे की नवीन हिरोने जून्या हिरोपेक्षा कायम चमकदार कामगिरी केली आहे.

विराट नावाच सध्या जे वादळ जोरदार घोंघावत आहे त्यातही ही हिरोगिरी कुठेतरी नक्की दिसते. येणारा काळ नक्की ठरवणार आहे ही विराट ह्या हिरोगिरीमध्ये कुठे आहे.  गावसकर, कपील, अझर, सचिन, धोनी आणि आता विराट…

यातील काही खेळाडूंवर कारकिर्दीच्या शेवटी चाहते, क्रिकेटप्रेमी, समीक्षक तसेच जनमानसातून जोरदार टीका झाली. अगदी क्रिकेटमध्ये विक्रमांचे विक्रम करणारा सचिनही याला अपवाद राहिला नाही.

सचिनप्रमाणेच भारताचा माजी कर्णधार एमएस धोनी सध्या अशाच काही अनुभवातून जात आहे.  यावर्षी या दिग्गज महान खेळाडूला कोणतीही विशेष कामगिरी करता आली नाही. मर्यादीत षटकांचंच क्रिकेट खेळत असलेल्या या खेळाडूने यावर्षी भारताकडून सर्वाधिक अर्थात २० वन-डे सामने खेळले. परंतु या सामन्यांत धोनीला मोठे अपयश आले.

या लेखात धोनीच्या यावर्षीच्या वन-डे कामगिरीचा आढावा घेण्यात आला आहे.

सामने खेळण्यात धोनी सर्वात पुढे- 

यावर्षी भारतीय संघ २० सामने खेळला. यातील २०पैकी २० सामने खेळणारा धोनी हा एकमेव भारतीय खेळाडू. यात त्याला १३ सामन्यांत फलंदाजीची संधी मिळाली. हे सर्व सामने खेळण्याचे कारण म्हणजे क्रिकेटमध्ये सर्वाधिक दमवणारा प्रकार अर्थात कसोटी क्रिकेट धोनी खेळत नाही. त्यामुळे वन-डे तसेच टी२० साठी खेळण्यापुर्वी प्रत्येक मालिकेपुर्वी या खेळाडूला चांगली विश्रांती मिळाली. त्यामुळे विश्रांतीच्या कारणाने धोनीला कोणत्याही मालिकेतून वगळण्यात आले नाही किंवा विश्रांती देण्यात आली नाही.

धावांमध्ये मात्र धोनी खूपच मागे- 

धोनीचा खेळण्याचा क्रमांक जरी ध्यानात घेतला तरी त्याच्या धावांचा त्याने खेळलेल्या सामन्यांशी मेळ घालणे अवघड आहे. भारताकडून यावर्षी सर्वाधिक धावा करणाऱ्या खेळाडूंमध्ये धोनी ५व्या स्थानावार आहे. भारतीय खेळाडूंनी यावर्षी सर्वांनी मिळुन वनडेत ४९२७ धावा केल्या. त्यात धोनीने याच २० सामन्यात १३ डावात केवळ २७५ धावा केल्या. म्हणजे भारतीय संघाच्या एकूण धावांच्या तुलनेत या धावा जेमतेम ५.५८% आहेत. या दरम्यान भारताकडून खेळलेल्या दिनेश कार्तिकने मात्र ७ सामन्यात ४१.७५च्या सरासरीने १६७ धावा केल्या.

स्ट्राईक रेटमध्येही धोनी मागेच- 

भारतीय फलंदाजी वन-डेत गेल्या काही वर्षात चमकदार कामगिरी करत आहे. त्यात विराट कोहली, शिखर धवन आणि रोहित शर्मा या त्रिकुटाने धावांचा अक्षरश: रतिब लावला आहे. त्यामुळे भारतीय संघाला यावर्षी बहुतेक सामन्यात चांगली सुरुवात मिळाली. त्यात विराटने सलामीवीर किंवा मधल्या फळीतील फलंदाजांना हाताशी धरुन भक्कम धावसंख्या संघाला उभारुन दिली. अशा वेळी खालच्या फळीत खेळणाऱ्या धोनीकडून फटकेबाजीची अपेक्षा होती. परंतु अशी कोणतीही कामगिरी ह्या खेळाडूकडून झाली नाही.

धोनीने यावर्षी वन-डेत ३८५ चेंडूत २७५ धावा केल्या. त्याचा स्ट्राईक रेट होता ७१.४२. हा स्ट्राईक रेट नक्कीच धोनी ज्या क्रमांकावर खेळतो त्यासाठी किंवा धोनी ज्यासाठी ओळखला जातो त्याला नावाला शोभेसा असा नव्हता.

एकही अर्धशतक नाही- 

धोनी आणि नाबाद अर्धशतकं हे गेल्या १० वर्षीतील एक खास समीकरण झालं होतं. धोनी येणार, धोनी पहाणार आणि धोनी विजयी षटकार मारताना नाबाद अर्धशतकंही करणार. परंतु यावर्षी १३ डावात फलंदाजी करताना धोनीला एकही अर्धशतकही करता आले नाही. ज्या वर्षी धोनीने वन-डे पदार्पण केले त्या २००४ नंतर पहिल्यांदाच असे घडले होते.

यावर्षी भारताने जिंकलेल्या सामन्यात धोनीची कामगिरी कशी राहिली?

भारतीय संघ यावर्षी जे २० सामने खेळला त्यातील १४ सामने जिंकला तर ४ सामन्यात संघाला पराभव पहायला लागला. शिवाय दोन सामने टाय राहिले. यातील संघ जे १४ सामने जिंकला त्यातील ७ सामन्यात फलंदाजी करताना धोनीने १९.३८च्या सरासरीने ११९ धावा केल्या. विशेष म्हणजे यात धोनीचा स्ट्राईक रेट हा जेमतेम ७२.५६ होता.

पराभूत झालेल्या ४ सामन्यात मात्र धोनीची सरासरी मात्र चांगली राहिली. त्याने या ४ सामन्यात ४२.६६च्या सरासरीने १२८ धावा केल्या. जे दोन सामने टाय राहिले त्या दोन्ही सामन्यात धोनीला फलंदाजीची संधी मिळाली होती. या दोन्ही सामन्यात संघाला सर्वाधिक गरज असताना हा खेळाडू बाद झाला. या दोन्ही सामन्यात त्याने १४च्या सरासरीने जेमतेम २८ धावा केल्या.

 महत्त्वाच्या बातम्या- 

महाराष्ट्र राज्य कबड्डी अजिंक्यपद स्पर्धेचे दुसऱ्या दिवसाचे निकाल, बाद फेरीत प्रवेश मिळवण्यासाठी साखळी सामन्यातील चुरस वाढली

ISL 2018: पुण्याला या हंगामातील पहिल्या विजयाची वाट

झी महाराष्ट्र कुस्ती दंगलचा ग्रँड लाँच आज, मान्यवरांच्या उपस्थितीत रंगणार झगमगता सोहळा

विंडीजविरुद्ध होणाऱ्या टी२० मालिकेसाठी अशी आहे टीम इंडिया