तर धोनी खेळू शकतो पुन्हा चेन्नई सुपर किंग्सकडून !

आयपीएलच्या ११ व्या मोसमात २ वर्ष बंदी घातलेले चेन्नई सुपर किंग्स आणि राजस्थान रॉयल्स संघ आपल्या पुनरागमनासाठी सज्ज झाले आहेत. याचवेळी त्यांना एक चांगली बातमी मिळाली आहे. ती बातमी म्हणजे कदाचित ते मागील दोन वर्ष पुणे आणि गुजरात संघाकडून खेळलेल्या त्यांच्या काही खेळाडूंना पुन्हा संघात घेऊ शकतात.

आयपीएलमध्ये खेळणारे संघांच्या संघमालकांनी जर पुढच्या महिन्यात होणाऱ्या वर्कशॉपमध्ये सहमती दर्शवली तर सगळ्यात जास्त उत्सुकता ज्या खेळाडूबद्दल आहे त्या एमएस धोनीला चेन्नई सुपर किंग्स संघात परत घेण्यासाठीचा मार्ग मोकळा होईल.

आयपीएल गव्हर्निंग कौन्सिलचे एक सदस्य बैठक संपल्यावर पीटीआयशी बोलताना म्हणाले की ” आम्ही कमीत कमी ३ खेळाडू-१ भारतीय आणि २ विदेशी खेळाडू संघात कायम ठेवण्याचा प्रस्ताव पुढच्या महिन्यात होणाऱ्या वर्कशॉपमध्ये संघमालकांपुढे ठेवणार आहोत. ज्यात मागील २ वर्षात पुणे आणि गुजरात संघाकडून खेळलेल्या खेळाडूंना चेन्नई सुपर किंग्स आणि राजस्थान रॉयल्स संघ आपल्या संघात कायम ठेऊ शकतात.”

हा प्रस्ताव जर मान्य झाला तर मागील दोन वर्ष पुणे सुपरजायंट्सकडून खेळलेल्या धोनीला सीएसकेचा संघ परत घेईल याची दाट शक्यता आहे. त्याचबरोबर गुजरात लायन्सकडून खेळलेले सुरेश रैना आणि रवींद्र जडेजाच्या बाबतीतही याची दाट शक्यता आहे.

आयपीएल अध्यक्ष राजीव शुक्ला यांच्याशी संपर्क झाल्यावर ते म्हणाले की जर जास्तीत जास्त संघमालकांना हे मान्य झाले तर राईट टू मॅचनुसार ३ ते ५ खेळाडू संघात कायम ठेवले जाऊ शकतात.

त्याचबरोबर काही संघमालकांना त्यांच्या वेतनात ६० करोड पासून ते ७५ करोड पर्यंत वाढ हवी आहे. तर काही संघमालकांना ८० करोड रुपयेपर्यंत वाढ हवी आहे.

“अनेक संघमालकांना ७५ करोड पर्यंत वाढ हवी आहे आणि मला वाटत हे पूर्ण होऊ शकते.” असेही ते अधिकारी म्हणाले.