एम एस धोनी ठरला या वर्षी हजार धावा पूर्ण करणारा सहावा भारतीय

इंदोर। भारताचा माजी कर्णधार एम एस धोनीने आज या वर्षातील आंतरराष्ट्रीय क्रिकेटमध्ये १००० धावा पूर्ण केल्या आहेत. त्याने होळकर क्रिकेट स्टेडिअम, इंदोर येथे सुरु असलेल्या भारत विरुद्ध श्रीलंका संघातील दुसऱ्या टी २० सामन्यात खेळताना ही कामगिरी केली.

यावर्षी आंतरराष्ट्रीय क्रिकेटमध्ये १००० धावा पूर्ण करणारा तो सहावा भारतीय ठरला आहे. याआधी विराट कोहलीने यावर्षी २००० धावांचा टप्पा पार केला आहे. तसेच रोहित शर्मा, शिखर धवन, चेतेश्वर पुजारा आणि अजिंक्य रहाणे यांनी यावर्षी १००० धावा पूर्ण केल्या आहेत.

धोनीने यावर्षी ४१ सामन्यात ५३.८९ च्या सरासरीने १०२४ धावा केल्या आहेत. यात त्याचे १ शतक आणि ७ अर्धशतके सामील आहेत. धोनीने या ४१ सामन्यांपैकी २९ वनडे सामने तर १२ टी २० सामने खेळले आहेत. त्याने या २९ वनडे सामन्यात या वर्षी ७८८ धावा केल्या आहेत आणि १२ टी २०त २३६ धावा केल्या आहेत.

धोनीने या वर्षाच्या सुरवातीला जानेवारी महिन्यातच कर्णधार पद सोडले होते त्यामुळे हे पूर्ण वर्ष तो फक्त यष्टीरक्षक फलंदाज म्हणून संघात खेळला आहे. तसेच त्याने डिसेंबर २०१४ मधेच कसोटी क्रिकेटमधून निवृत्ती घेतली होती. त्यामुळे तेव्हापासून तो भारताकडून फक्त वनडे आणि टी २० सामन्यात खेळला आहे.

धोनीने आज २१ चेंडूत २८ धावा केल्या. यात त्याने २ चौकार आणि २ षटकार मारले. भारताने या सामन्यात प्रथम फलंदाजी करताना ५ बाद २६० धावा केल्या आहेत.

आंतरराष्ट्रीय क्रिकेटमध्ये यावर्षी १००० धावा पूर्ण करणारे भारतीय खेळाडू:
१. विराट कोहली – २८१८
२.रोहित शर्मा- १७६६
३.शिखर धवन – १६३७
४. चेतेश्वर पुजारा – ११४०
५. अजिंक्य रहाणे – ११४०
६. एम एस धोनी – १०२४