धोनी महान खेळाडू आहे- भुवनेश्वर कुमार

तिरुअनंतपुरम। भारताचा वेगवान गोलंदाज भुवनेश्वर कुमारने काल पत्रकार परिषदेत एमएस धोनीला पाठिंबा देत त्याच्या टीकाकारांना चोख उत्तरे दिली आहेत. आज भारत विरुद्ध न्यूझीलंड संघात होणाऱ्या तिसऱ्या आणि निर्णायक टी २० सामन्याच्या पूर्वसंध्येला झालेल्या पत्रकार परिषदेत तो बोलत होता.

भुवनेश्वर धोनीवर झालेल्या टिकेबद्दल विचारलेल्या प्रश्नाला उत्तर देताना म्हणाला, ” आम्ही त्याबद्दल जास्त विचार करत नाही. तुम्ही  त्याचे विक्रम बघा, तो महान खेळाडू आहे आणि त्याने जे काही केले आहे ते देशासाठी केले आहे. त्यामुळे संघातील कोणालाही त्याच्याबद्दल शंका नाही.”

न्यूझीलंड विरुद्ध झालेल्या दुसऱ्या टी २० सामन्यानंतर धोनीच्या फलंदाजीवरून भारताचे माजी खेळाडू व्हीव्हीएस लक्ष्मण आणि अजित आगरकर यांनी धोनीवर टीका करताना म्हणाले होते की आता नवीन चेहऱ्यांना संधी द्यायला हवी.

भुवनेश्वरच्या फलंदाजी कौशल्यविषयी त्याला विचारले असता त्याने संघाचे फलंदाजी प्रशिक्षक संजय बांगर यांची मदत झाल्याचे सांगितले. तसेच तो म्हणाला “मी कसोटी क्रिकेटमध्ये चांगली फलंदाजी केली आणि वनडेमधेही तशी फलंदाजी करायची आहे. श्रीलंका विरुद्ध खेळलेली खेळी आणि धोनीबरोबर केलेल्या भागीदारीने मला आत्मविश्वास दिला. मी परिस्थितीनुसार फलंदाजी करतो. याचे बरेचसे श्रेय बांगर यांना जाते.”