आठवतंय का? धोनीचा कर्णधार म्हणून शेवटचा सामना कोणता

चेन्नई सुपर किंग्जचा कर्णधार एमएस धोनी हा भारतीय राष्ट्रीय संघाचा सर्वात यशस्वी कर्णधार आहे. त्याच्याच नेतृत्वाखाली भारतीय संघाने २० षटकांचा विश्वचषक, ५० षटकांचा विश्वचषक आणि चॅम्पियन ट्राफी जिंकली. तर चेन्नई सुपर किंग्ज संघही आयपीएलचे दोन वेळा आणि दोन वेळा चॅम्पियन लीगचे विजेते ठरले आहे. 

एवढा मोठा कारनामा करुनही हा खेळाडू तब्बल १ वर्षापेक्षा जास्त काळ कोणत्याही संघाचा कर्णधार नव्हता. गेल्या वर्षी त्याला अनपेक्षितपणे पुण्याच्या संघाच्या कर्णधारपदावरून पायउतार व्हावे लागले. 

त्यामुळे हा खेळाडू शेवटच्या वेळी कर्णधारपदावर केव्हा होता हा मोठा प्रश्न चाहत्यांना पडणे सहाजिकच आहे. धोनीने १८ मार्च २०१७ म्हणजे तब्बल १३ महिन्यांपूर्वी कर्णधार म्हणून जबाबदारी पार पाडली होती. 

हा सामना विजय हजारे ट्राॅफीचा होता आणि धोनीचा संघ होता झारखंड. सेमीफायनलच्या या सामन्यात झारखंडचा मनोच तिवारीच्या बंगाल संघाने ४१ धावांनी पराभव केला होता. 

त्या सामन्यात कर्णधार धोनीने ६२ चेंडूत ७० धावा करत सामना जिंकण्यासाठी मोठे प्रयत्न केले होते.

त्यानंतर आज ७ एप्रिल २०१८ रोजी धोनी जेव्हा मुंबईच्या शेषराव वानखेडे स्टेडीअमवर नाणेफेकीला येईल तेव्हा या महान खेळाडूच्या चाहत्यांचा आनंद गगनात मावेनासा होईल.