जेव्हा एमएस धोनी भेटतो त्याच्या ८७ वर्षीय फॅनला…

भारतीय संघाचा माजी कर्णधार एमएस धोनीचे जगभरात अनेक चाहते आहेत. त्यामुळे तो जिथेही जातो तिथे त्याला त्याच्या चाहत्यांकडून प्रोत्साहन मिळत असते. तोही कधी चाहत्यांना नाराज करत नाही.

धोनी सध्या ऑस्ट्रेलिया दौऱ्यावर असून तिथे सिडनी वनडे सामन्याच्या आधी त्याला 87 वर्षीय आजी भेटली, ही आजी धोनीची मोठी चाहती आहे. तिचे नाव इडिथ असून ती सिडनीमध्ये भारतीय संघाचे सराव सत्र सुरु असताना तिच्या मुलाबरोबर आली होती.

त्यावेळी सरावानंतर धोनी तिला भेटला. त्याने त्या आजींबरोबर काही फोटो काढले. तसेच त्याने तिच्याशी काही गप्पाही मारल्या. याचे फोटो आणि व्हिडिओ सध्या सोशल मिडियावर चांगलेच व्हायरल होत आहेत.

धोनीसाठी ऑस्ट्रेलिया दौऱ्याची सुरुवात खास झाली आहे. त्याने सिडनी येथे ऑस्ट्रेलिया विरुद्ध झालेल्या पहिल्या वनडेमध्ये 51 धावांची खेळी केली आहे. याबरोबरच भारताकडून वनडे क्रिकेटमध्ये 10 हजार धावा पूर्ण करण्याचा टप्पाही पूर्ण केला आहे.

मात्र भारताला या सामन्यात 34 धावांनी पराभवाला सामोरे जावे लागले आहे. या सामन्यात ऑस्ट्रेलियाने प्रथम फलंदाजी करताना 288 धावसंख्या उभारत भारतासमोर 289 धावांचे लक्ष ठेवले होते. मात्र भारताला 50 षटकात 254 धावाच करता आल्या.

भारताकडून रोहित शर्माने 133 धावांची शतकी खेळी आणि एमएस धोनीने 51 धावांची अर्धशतकी खेळी करत चांगली लढत दिली होती. तसेच या दोघांनी मिळून चौथ्या विकेटसाठी 137 धावांची भागीदारी रचली होती.

महत्त्वाच्या बातम्या-

युवराज सिंगची ती भविष्यवाणी ठरली खरी…

भारतीय क्रिकेटच्या इतिहासात दुसऱ्यांदाच घडली अशी घटना

Video: जेव्हा यजुवेंद्र चहल घेतो रोहित शर्माची मुलाखत!