आणि कॅप्टन कूलचा तो ‘कूल’ विक्रम हुकला!

भारताचा सर्वात यशस्वी कर्णधार म्हणून एमएस धोनी आज आपला ३६वा वाढदिवस साजरा करत आहे. या खेळाडूने भारताकडून सर्वाधिक सामन्यात नेतृत्व केले. तसेच सर्वच प्रकारच्या क्रिकेटमध्ये भारतीय संघाला सर्वाधिक सामने जिंकूनही दिले आहेत.

तरीही या माजी कर्णधाराचा असा एक विक्रम आहे जो अगदी एका सामन्याने हुकला. धोनीने भारतीय संघाला कर्णधार या नात्याने ११० एकदिवसीय सामन्यांत विजय मिळवून दिला आहे. एकदिवसीय सामन्यांत भारतीय संघाला १०० पेक्षा जास्त मिळवून देणारा तो एकमेव कर्णधार आहे. परंतु यासाठी धोनीने १९९ सामन्यात भारताचं नेतृत्व केलं आहे.

२०० किंवा त्यापेक्षा जास्त एकदिवसीय सामन्यात देशाचं नेतृत्व करण्याचा मान यापूर्वी फक्त ऑस्ट्रलियाच्या रिकी पॉन्टिंग आणि न्युझीलँडच्या स्टिफेन फ्लेमिंग यांना मिळाला आहे. रिकी पॉन्टिंगने २३० तर स्टिफेन फ्लेमिंगने २१८ एकदिवसीय सामन्यांत त्यांच्या देशाचं नेतृत्व केलं आहे.

जानेवारी महिन्यात भारताच्या या माजी कर्णधाराने एकदिवसीय तसेच टी२० क्रिकेटचे भारतीय संघाचे कर्णधारपद सोडले. अगदी एक सामना जास्त खेळूनही तो हा विक्रम करू शकत होता. परंतु या खेळाडूने कायमच देश आणि संघ यांना प्राधान्य दिले आहे.