एमएस धोनीच्या चाहत्यांसाठी ही आहे सर्वात मोठी खुशखबर

आॅस्ट्रेलिया दौऱ्यावर असणाऱ्या भारतीय संघाची सध्या आॅस्ट्रेलिया विरुद्ध चार सामन्यांची कसोटी मालिका सुरु आहे. या मालिकेनंतर भारतीय संघ आॅस्ट्रेलिया विरुद्ध 3 सामन्यांची वनडे मालिका खेळणार आहे. त्यानंतर भारतीय संघ न्यूझीलंड दौऱ्यावर जाणार आहे.

या दौऱ्यात 5 वनडे आणि 3 टी20 सामन्यांच्या मालिका होणार आहेत. या मालिकांसाठी बीसीसीआयने आॅस्ट्रेलिया आणि न्यूझीलंड विरुद्ध होणाऱ्या मर्यादीत षटकांच्या मालिकांसाठी संघाची घोषणा केली आहे.

आज घोषित झालेल्या न्यूझीलंड विरुद्धच्या टी20 मालिकेसाठी भारतीय संघात माजी कर्णधार एमएस धोनीचे पुनरागमन झाले आहे. त्याला याआधी विंडीज आणि आॅस्ट्रेलिया विरुद्धच्या टी20 मालिकेतून वगळण्यात आले होते. तो भारताकडून शेवटचे नोव्हेंबरमध्ये विंडीज विरुद्धच्या वनडे मालिकेत खेळला आहे.

त्याचबरोबर सप्टेंबरमध्ये झालेल्या एशिया कपमध्ये दुखापतीला सामोरे जावे लागलेल्या हार्दिक पंड्या आणि केदार जाधवचेही भारताच्या संघात पुनरागमन झाले आहे. तसेच कृणाल पंडयालाही टी20 मालिकेसाठी भारतीय संघात स्थान मिळाले आहे.

न्यूझीलंड विरुद्धच्या या टी20 मालिकेसाठी धोनीला पर्याय म्हणून रिषभ पंत आणि दिनेश कार्तिक यांचाही समावेश करण्यात आला आहे.

या मालिकेमध्ये नेतृत्व विराट कोहली करेल. तर उपकर्णधारपद रोहित शर्मा सांभाळेल.

भारतीय संघ 12,15 आणि 18 जानेवारीला अनुक्रमे सिडनी, अॅडलेड आणि मेलबर्न येथे आॅस्ट्रेलियाविरुद्ध वनडे सामने खेळणार आहे. तसेच त्यानंतर न्यूझीलंड विरुद्ध 23,26,28, 31 जानेवारी आणि 3 फेब्रुवारी असे पाच वनडे सामने होणार आहेत. तस 6,8 आणि 10 फेब्रुवारीला टी20 सामने होणार आहेत.

न्यूझीलंड विरुद्धच्या टी20 मालिकेसाठी असा आहे भारतीय संघ –

विराट कोहली(कर्णधार), रोहित शर्मा(उपकर्णधार), केएल राहुल, शिखर धवन, रिषभ पंत, दिनेश कार्तिक, केदार जाधव, एमएस धोनी, हार्दिक पंड्या, कृणाल पंड्या, कुलदीप यादव, युजवेंद्र चहल, भुवनेश्वर कुमार, जसप्रीत बुमराह, खलील अहमद.

महत्त्वाच्या बातम्या:

ऑस्ट्रेलिया, न्यूझीलंड विरुद्ध वनडे मालिकेसाठी अशी आहे १६ खेळाडूंची टीम इंडिया

बाॅक्सिंग डे टेस्टमधून टीम इंडियाचा हा शिलेदार जवळपास बाहेर

२० वर्षापूर्वी केलेल्या मास्टर ब्लास्टरच्या त्या विक्रमाला विराट कोहली देणार धक्का ?