धोनीने असे केले चेन्नई सुपर किंग्सचे स्वागत

दोन वर्षांच्या बंदी नंतर चेन्नई सुपर किंग्सचा संघ २०१८च्या मोसमात पुन्हा दाखल होत आहे. चेन्नई सुपर किंग्सच्या नेतृत्वाची धुरा सर्व मोसमात सांभाळलेल्या कॅप्टन कूल एमएस धोनीने आपल्या या संघाचे खास स्वागत केले आहे.

त्यासाठी धोनीने इंस्टाग्रामवर एक खास फोटो शेअर केला आहे. त्यात धोनीने पिवळ्या रंगाचा टी शर्ट घातला असून त्यावर ७ हा नंबर आहे आणि पाठीमागे थाला असे लिहिले आहे.

तामिळनाडू मध्ये थाला आणि थलैवा हे खास शब्द रोज वापरले जातात. त्यात थलैवा हा शब्द रजनीकांत यांना वापरला जातो. तर तमीळ भाषेतील ‘थाला’ या शब्दाचा अर्थ आहे नेता किंवा बॉस.

धोनीच्या नेतृत्वाखाली चेन्नई संघाने अतिशय चांगली कामगिरी केली असून २ आयपीएल विजेतेपद आणि दोन चॅम्पियन ट्रॉफी विजेतेपद त्यांनी मिळवले आहेत. गेले दोन मोसम पुणे संघाकडून खेळलेल्या धोनीला सुद्धा पुन्हा आपल्या या आयपीएल संघात परतण्याचे वेध लागले असल्याचे या छायाचित्रात स्पष्ट दिसत आहे .