विंडीज विरुद्धच्या टी20 मालिकेत या खेळाडूकडे असेल सर्वांचे लक्ष

कोलकता। भारत विरुद्ध विंडीज संघात रविवारपासून (4 नोव्हेंबर) 3 सामन्यांची टी20 मालिका सुरु होणार आहे. या मालिकेतून भारताचा माजी कर्णधार एमएस धोनीला वगऴण्यात आले आहे.

त्याच्या ऐवजी यष्टीरक्षक म्हणून रिषभ पंत आणि दिनेश कार्तिकचा संघात समावेश करण्यात आला आहे. त्यामुळे धोनीच्या अनुपस्थितीत 21 वर्षीय रिषभ पंतला चांगली कामगिरी करुन प्रभावित करण्याची सुवर्ण संधी आहे.

धोनीच्या अनुपस्थितीत पंतलाच प्रामुख्याने संधी मिळणार असल्याचे भारताचा प्रभारी कर्णधार रोहित शर्माने संकेत दिले आहेत.

तसेच पंत धोनीच्या अनुपस्थित पहिल्यांदाच आंतरराष्ट्रीय टी20 सामना खेळणार आहे. त्याचबरोबर पंतची आॅस्ट्रेलिया दौऱ्यातील टी20 आणि कसोटी मालिकेसाठीही निवड करण्यात आली आहे. त्यामुळे त्याच्या कामगिरीकडे सर्वांचेच लक्ष असणार आहे.

अनेक क्रिकेट तज्ञांच्या मते 2019 च्या विश्वचषकानंतर धोनी आंतरराष्ट्रीय क्रिकेटमधून निवृत्ती घेणार आहे. त्यामुळे भारताला काही महिन्यांनी एका चांगल्या यष्टीरक्षकाची गरज भासणार आहे. याचाच विचार करता पंतकडे धोनीचा वारसदार म्हणून पाहिले जात आहे. पण त्याआधी आता पंतला स्वत:ला सिद्ध करावे लागणार आहे.

पंतने आत्तापर्यंत भारताकडून पाच कसोटी सामने, चार टी20 आणि तीन वनडे सामने खेळले आहेत. त्याने कसोटी क्रिकेटमध्ये इंग्लंड विरुद्ध पदार्पण करताना चांगली कामगिरी केली होती. त्याने इंग्लंड दौऱ्यात कसोटीत एक शतक आणि दोन अर्धशतके करत सर्वांना प्रभावित केले होते.

मात्र त्याला विंडीज विरुद्धच्या वनडे मालिकेत चमकदार कामगिरी करण्यात अपयश आले होते. पण त्याचे वय लक्षात घेता त्याच्याकडे भारतीय संघातील स्थान भक्कम करण्याची संधी आहे. कारण पार्थिव पटेल आणि दिनेश कार्तिक हे भारतासाठी यष्टीरक्षक म्हणून अन्य पर्याय आहेत. पण हे दोघांनीही वयाची तिशी पार केली आहे.

त्यामुळे आता पंत मिळालेल्या सुवर्णसंधीचा कसा फायदा घेतो हे पहावे लागणार आहे.

असा आहे 4 नोव्हेंबर पासून सुरु होणाऱ्या विंडीज विरुद्धच्या टी20 मालिकेसाठी भारतीय संघ-

रोहित शर्मा(कर्णधार), शिखर धवन, केएल राहुल, दिनेश कार्तिक, मनिष पांडे, श्रेयस अय्यर, रिषभ पंत, कृणाल पंड्या, वॉशिंगटन सुंदर, युजवेंद्र चहल, कुलदीप यादव, भुवनेश्वर कुमार, जसप्रीत बुमराह, खलील अहमद, उमेश यादव, शहाबाज नदीम.

महत्त्वाच्या बातम्या:

टीम इंडियाच्या जेवणात बीफ नकोच… पहा कुणी केलीय ही मागणी

फक्त विराट कोहलीच कसोटी क्रिकेटला जिवंत ठेऊ शकतो, दिग्गजाचे रोखठोक मत

टी२० मालिकेसाठी टीम इंडिया सज्ज, या ५ विक्रमांकडे नक्की लक्ष ठेवा