पुढील २४ तासांत टीम इंडियाची घोषणा, धोनीबद्दल होणार हा मोठा निर्णय

भारतीय संघ आॅस्ट्रेलिया दौऱ्यावर असून त्यांची सध्या चार सामन्यांची कसोटी मालिका सुरु आहे. या मालिकेनंतर भारतीय संघ 12 जानेवारीपासून आॅस्ट्रेलिया विरुद्ध 3 सामन्यांची वनडे मालिका खेळणार आहे.

तसेच त्यानंतर भारतीय संघ न्यूझीलंड दौऱ्यावर जाणार असून या दौऱ्यात 5 वनडे आणि 3 टी20 सामन्यांच्या मालिका होणार आहेत. त्यामुळे बीसीसीआय पुढील 24 तासात आॅस्ट्रेलिया आणि न्यूझीलंड विरुद्ध होणाऱ्या मर्यादीत षटकांच्या मालिकांसाठी संघाची घोषणा करण्याची शक्यता आहे.

आॅस्ट्रेलिया आणि न्यूझीलंड विरुद्ध होणाऱ्या वनडे मालिकांसाठी भारतीय संघात यष्टीरक्षक फलंदाज एमएस धोनीच्या पुनरागमनाची दाट शक्यता आहे. या मालिकांसाठी घोषित होणारा संघ पुढीलवर्षी इंग्लंड आणि वेल्समध्ये होणाऱ्या विश्वचषकासाठी कायम राहण्याची शक्यता आहे. यात जास्तीत जास्त दोन किंवा तीन बदल होऊ शकतात.

धोनी हा मागील काही सामन्यांपासून धावा करण्यासाठी संघर्ष करत आहे. त्याने या वर्षात वनडेत 13 डावात 25 च्या सरासरीने 275 धावा केल्या आहेत. तसेच यात त्याच्या एकाही अर्धशतकाचा समावेश नाही.

पण असे असले तरी त्याचा अनुभव आणि यष्टीरक्षणातील अफलातून कामगिरी, यामुळे त्याचे वनडे संघातील स्थान जवळजवळ पक्के आहे. त्याचबरोबर त्याच्या अनुभवाचा नेहमी युवा खेळाडूंना आणि कर्णधार विराट कोहलीला फायदा होत असतो.

याच गोष्टीमुळे बीसीसीआयचे निवड समीती अध्यक्ष एमएसके प्रसाद यांनी धोनी हा विश्वचषकासाठी यष्टीरक्षक म्हणून पहिली पसंती असेल, असे याआधीच स्पष्ट केले आहे.

याबरोबरच मुंबई मिररने दिलेल्या वृत्तानुसार धोनीचा आॅस्ट्रेलिया आणि न्यूझीलंड विरुद्धच्या वनडे मालिकांबरोबर न्यूझीलंड विरुद्धच्या टी20 मालिकेतही समावेश होऊ शकतो. धोनीला त्याच्या खराब कामगिरीमुळे विंडीज आणि आॅस्ट्रेलिया विरुद्धच्या टी20 मालिकेतून वगळण्यात आले होते.

तसेच पंतचाही वनडे आणि टी20 च्या संघात समावेश असू शकतो. मात्र दिनेश कार्तिकला भारतीय संघातून वगळण्याची शक्यता आहे. याबरोबरच आॅस्ट्रेलियातील कसोटीतील खराब कामगिरीचा फटका केएल राहुलला बसण्याचीही शक्यता आहे. त्यालाही वनडे आणि टी20 मालिकांमधून त्याचे स्थान गमवावे लागू शकते.

भारतीय संघ 12,15 आणि 18 जानेवारीला अनुक्रमे सिडनी, अॅडलेड आणि मेलबर्न येथे आॅस्ट्रेलियाविरुद्ध वनडे सामने खेळणार आहे. तसेच त्यानंतर न्यूझीलंड विरुद्ध 23,26,28, 31 जानेवारी आणि 3 फेब्रुवारी असे पाच वनडे सामने होणार आहेत. तस 6,8 आणि 10 फेब्रुवारीला टी20 सामने होणार आहेत.

महत्त्वाच्या बातम्या:

शाहरुख म्हणतो, मला या भारतीय क्रिकेटरचा रोल करायचा आहे

बाॅक्सिंग डे टेस्टमधून टीम इंडियाचा हा शिलेदार जवळपास बाहेर

२० वर्षापूर्वी केलेल्या मास्टर ब्लास्टरच्या त्या विक्रमाला विराट कोहली देणार धक्का ?