…म्हणून रायडू ऐवजी विजय शंकरचा झाला विश्वचषकासाठी टीम इंडियात समावेश

30 मे पासून इंग्लंड आणि वेल्समध्ये 2019 आयसीसी विश्वचषक स्पर्धा रंगणार आहे. त्यामुळे जेमतेम दीड महिना राहिलेल्या या स्पर्धेसाठी आज(15 एप्रिल) 15 जणांच्या भारतीय संघाची निवड करण्यात आली आहे.

या 15 जणांच्या संघाची निवड करताना काही आश्चर्यकारक निर्णय घेण्यात आले आहेत. त्यामध्ये दिनेश कार्तिक आणि विजय शंकर यांना अनुक्रमे रिषभ पंत आणि अंबाती रायडू ऐवजी संधी मिळाली आहे.

या 15 जणांच्या संघात चौथ्या क्रमांकावर फलंदाजीसाठी रायडूला प्रबळ दावेदार मानले जात होते. परंतू त्याला त्रिआयामी खेळाडू असणाऱ्या विजय शंकरने मागे टाकत विश्वचषकासाठी संघात स्थान मिळवले आहे.

याबद्दल बोलताना बीसीसीआय निवड समीतीचे अध्यक्ष एमएसके प्रसाद म्हणाले, ‘चॅम्पियन्स ट्रॉफीनंतर आम्ही मधल्या फळीतील अनेक फलंदाजांना संधी दिली. यात कार्तिक, श्रेयस अय्यर, मनिष पांडे यांचा समावेश होता.’

‘आम्ही रायडूलाही काही अधिक संधी दिल्या, पण विजय शंकर हा त्रिआयामी खेळाडू आहे. तो फलंदाजी करु शकतो, जर गरज लागली तर गोलंदाजी करु शकतो. तसेच तो क्षेत्ररक्षक आहे. आम्ही त्याला चौथ्या क्रमांकाचा फलंदाज म्हणून पाहत आहोत. आता आमच्याकडे त्या जागेसाठी बरेचसे पर्याय आहेत.’

त्याचबरोबर प्रसाद यांनी असेही म्हटले आहे की केएल राहुलला पर्यायी सलामीवीर म्हणून संघात घेतले आहे, पण संघ व्यवस्थापनाला गरज वाटली तर ते त्याला मधल्या फळीतही खेळवू शकतात.

असा आहे 2019 विश्वचषकासाठी भारतीय संघ-

विराट कोहली(कर्णधार), रोहित शर्मा(उपकर्णधार ), शिखर धवन, केएल राहुल, दिनेश कार्तिक,केदार जाधव, एमएस धोनी, हार्दिक पंड्या, विजय शंकर,रविंद्र जडेजा, कुलदीप यादव, युजवेंद्र चहल, जसप्रीत बुमराह, भुवनेश्वर कुमार, मोहम्मद शमी.

महत्त्वाच्या बातम्या –

या कारणामुळे कार्तिकला मिळाली पंत ऐवजी विश्वचषकासाठी टीम इंडियात संधी

या दोन गोलंदाजांना अजूनही मिळू शकते विश्वचषकासाठी टीम इंडियात संधी