मुंबईकर पृथ्वी शॉ भारतीय संघाचा १९ वर्षांखालील विश्वचषकासाठी कर्णधार

काल बीसीसीआयने २०१८ ला न्यूझीलंडमध्ये होणाऱ्या १९ वर्षांखालील विश्वचषकासाठी संघ जाहीर केला. या संघाचा कर्णधार म्हणून मुंबईकर पृथ्वी शॉचे नाव घोषित करण्यात आलेले आहे. त्याचबरोबर शुभम गिलला उपकर्णधार करण्यात आलेले आहे.

हा विश्वचषक १६ संघांमध्ये रंगणार असून १३ जानेवारी ते ३ फेब्रुवारी २०१८ पर्यंत न्यूझीलंडला पार पडेल. १९ वर्षांखालील भारतीय संघाने आत्तापर्यंत २०००,२००८,२०१२ असा ३ वेळा हा विश्वचषक जिंकला आहे. तसेच २०१६ ला बांग्लादेशात पार पडलेल्या १९ वर्षांखालील विश्वचषकात भारतीय संघ उपविजेता ठरला होता. त्यांना अंतिम सामन्यात विंडीज संघाकडून पराभव स्वीकारावा लागला होता.

भारतीय संघ सर्वाधिक वेळा १९ वर्षांखालील विश्वचषक जिंकणारा ऑस्ट्रेलियासह सर्वात यशस्वी संघ आहे. ऑस्ट्रेलियाच्याही संघाने आत्तापर्यंत या विश्वचषक स्पर्धेत ३ वेळा (१९८८,२००२,२०१०) विजेतेपद मिळवले आहे.

या विश्वचषकाच्या तयारीसाठीचे शिबीर ८ डिसेंबर ते २२ डिसेंबर पर्यंत बंगळुरूला होणार आहे. या शिबिरासाठी रणजी ट्रॉफीत मुंबईकडून दमदार कामगिरी करणारा पृथ्वी शॉ आणि बंगाल संघाचा ईशान पोरेल हे रणजी ट्रॉफीची उपांत्यपूर्व फेरीचे सामने संपल्यानंतर १२ डिसेंबरला सहभागी होतील.

१९ वर्षांखालील विश्वचषक २०१८ साठीचा भारतीय संघ:

पृथ्वी शॉ (कर्णधार), शुभम गिल (उपकर्णधार), मंजोत कल्रा, हिमांशू राणा, अभिषेक शर्मा, रियान पराग, आर्यन जुयाल (यष्टीरक्षक), हार्वीक देसाई (यष्टीरक्षक), शिवम मावी, कमलेश नागरकोटी, ईशान पोरेल, आर्षदीप सिंग, अनुकूल रॉय, शिवा सिंग, पंकज यादव.

राखीव खेळाडू: ओम भोसले, राहुल चहर, निनाद राठवा, उर्विल पटेल आणि आदित्य ठाकरे.