ISL 2017: मुंबई सिटीला मिळालेल्या पेनल्टीच्या जोरावर चेन्नईयीनची घोडदौड खंडित

मुंबई: हिरो इंडियन सुपर लिगमध्ये सलग तीन विजय मिळवलेल्या चेन्नईयीन एफसीची घोडदौड खंडित झाली. मुंबई सिटी एफसीने घरच्या मैदानावर पेनल्टी किकच्या जोरावर महत्वाचा विजय संपादन केला. अचीले एमाना याने सुवर्णसंधीचे गोलमध्ये रुपांतर केले.
 
चेन्नईने यापूर्वी गतविजेता एटीके, एफसी पुणे सिटी आणि नॉर्थईस्ट युनायटेड यांना हरविले होते. मुंबईने मोसमातील दुसरा विजय मिळविला, तर चेन्नईचा हा दुसरा पराभव ठरला. मुंबईने दोन विजय आणि एक बरोबरी अशा कामगिरीसह सात गुण मिळविले. मुंबई पाचव्या स्थानावर आहे. चेन्नईने नऊ गुणांसह तिसरे स्थान राखले.
पूर्वार्धातील गोलशून्य बरोबरीची कोंडी उत्तरार्धात सुमारे अर्ध्या तासाने सुटली. ५८व्या मिनिटाला मुंबईचा स्ट्रायकर बलवंत सिंगला चेन्नईचा बचावपटू मैल्सन अल्वेस याने पाडले.

 

त्याने चेन्नईचा गोलरक्षक करणजीत याचा अंदाज चुकवित धुर्तपणे किक मारली. त्याने नेटच्या डाव्या बाजूने चेंडू आत मारला. पिछाडीनंतर चेन्नईने कसून प्रयत्न केले, पण मुंबईने घरच्या मैदानावर बचाव अभेद्य ठेवला. यात गोलरक्षक अमरिंदर सिंग याचा महत्त्वाचा वाटा होता.
 
तत्पुर्वी, पुर्वार्धात अटीतचीचा खेळ झाला. पहिल्याच मिनिटाला चेन्नईने कॉर्नर दवडला, तर चौथ्या मिनिटाला मुंबईने फ्री-किक वाया घालवली. सातव्या मिनिटाला चेन्नईला फ्री-किक मिळाली.

 

 पंधराव्या मिनिटाला करणजीतने पुन्हा आपली जबाबदारी चोखपणे पार पाडली. डाव्या बाजूने गेर्सन व्हिएरा याने घोडदौड करीत एव्हर्टन सँटोसच्या दिशेने चेंडू मारला.
सँटोसने उडी घेत हेडींग केले, पण करणजीतने त्याच्या हालचालींचा अंदाज घेत योग्य ठिकाणी चपळाईने जात चेंडू अडविला. सोळाव्या मिनिटाला मिहेलीच याची फ्री-कीक मुंबईच्या बचावपटूंनी भेदली.

 

एकोणीसाव्या मिनिटाला चेन्नईने आणखी एक फ्री-किक मिळविली. त्याने मारलेला चेंडू मुंबईच्या खेळाडूच्या स्पर्शामुळे बाहेर गेला. त्यामुळे कॉर्नर मिळाला. त्यावर पुन्हा मिहेलीच पुढे सरसावला, पण त्याला भेदक फटका मारता आला नाही.
 
पुर्वार्धाच्या अंतिम टप्यात थोई सिंगच्या चालीवर महंमद रफी याने हेडींग केले, पण मुंबईचा गोलरक्षक अमरिंदर सिंग याने चपळाई दाखविली.

 

पुर्वार्धात दोन्ही संघांनी कसून प्रयत्न केले, पण त्यांना खाते उघडता आले नाही. उत्तरार्धातही चुरशीने खेळ झाला. अचिले एमाना याची घोडदौड चेन्नईने रोखली. ४९व्या मिनिटाला मिहेलीचने सुरेख चाल रचली.

 

त्यावेळी नेट मोकळे असूनही थोईला संधी साधता आली नाही. पंचावन्नाव्या मिनिटाला जेरी लालरीनझुलाने बायसिकल किकचा प्रयत्न केला, पण तो अपयशी ठरला.