वयाच्या १६ वर्षी द्विशतक करत मुंबईकर जेमिमा रोड्रिगेजने रचला इतिहास

औरंगबाद । जेमिमा रोड्रिगेज नावाच्या एका खेळाडूने महिलांच्या अंडर १९ वनडे स्पर्धेत १६३ चेंडूत द्विशतक ठोकले आहे. 

औरंगबाद येथे झालेल्या मुंबई विरुद्ध सौराष्ट्र सामन्यात मुंबईकडून खेळताना जेमिमा रोड्रिगेजने तुफानी फटकेबाजी करत हा विक्रम केला. तिच्या या कामगिरीमुळे मुंबईने ५० षटकांत ३४७ धावा केल्या. 

जेमिमा रोड्रिगेजने वयाच्या १३व्या वर्षी मुंबईच्या अंडर १९ वर्षीय संघात स्थान मिळवले होते. तिने या स्पर्धेत २ शतके केली असून तिची सरासरी ३०० ची आहे. 

विशेष म्हणजे याच स्पर्धेत गुजरातविरुद्ध खेळतानाही तिने १७८ धावा केल्या होत्या. तिचे द्विशतक थोडक्यात हुकले होते. 

जेमिमा रोड्रिगेजने अतिशय कमी वयात क्रिकेट खेळायला सुरुवात केली असून तिने कारकिर्दीची सुरुवात गोलंदाज म्हणून केली होती. परंतु पुढे फलंदाजीला प्राधान्य देताना तिने सलामीवीर किंवा तिसऱ्या क्रमांकावर खेळायला सुरुवात केली. 

यापूर्वी केवळ ६ महिला खेळाडूंना अंडर १९ क्रिकेट स्पर्धेत अशी कामगिरी करता आली आहे. त्यात भारताच्या स्म्रिती मानधनाने २०१३ साली गुजरात विरुद्ध खेळताना ही कामगिरी केली होती. 

विशेष म्हणजे तिच्या या खेळीचे कौतुक भारतीय कसोटी संघाचा उपकर्णधार अजिंक्य रहाणेनेही केले आहे.