मुंबई रणजी संघाच्या प्रशिक्षकपदासाठी खेळाडुंची ओंकार साळवीच्या नावाला पसंती

मुंबई रणजी संघाचे प्रशिक्षक समीर दिघेँनी कार्यकाळ वाढवून घेण्यास नकार दिल्याने प्रशिक्षकपद रिकामे होते, यामुळे नवीन प्रशिक्षकाचा शोध सुरू झाला. मुंबईचा माजी जलदगती गोलंदाज अविष्कार साळवी याचा भाऊ ओंकार साळवीच नाव आघाडीवर आहे.

ओंकार गेल्या चार मोसमापासून मुंबईच्या सिनीयर संघाचा गोलंदाजी प्रशिक्षक होता पण त्याचाही कार्यकाळ संपला आहे. ओंकारला मुंबईकडून क्रिकेट खेळण्याची कधीच संधी मिळाली नाही.

सुत्रांच्या मिळालेल्या माहितीनुसार, मुंबई क्रिकेट असोसिएशनचे (एमसीए) सचिव उन्मेश खानविलकर यांनी मुंबई रणजी संघाच्या प्रशिक्षक निवडीसंदर्भात तसेच मुंबई क्रिकेटला कसे पुढे नेता येईल याबाबतीत कर्णधार आदित्य तरे, अभिषेक नायर,शार्दुल ठाकुर,सुर्यकुमार यादव,धवल कुलकर्णी या पाच महत्त्वाच्या खेळाडुंबरोबर चर्चा केली. खेळाडुंनी साळवी यांच्या नावाला पसंती दर्शवली आहे.

फिजीओ आणि ट्रेनर निवडीसंदर्भात नॅशनल क्रिकेट अकॅडमीशी चर्चा करावी असे खेळाडुंनी सांगितले. फिजीओ आशुतोष निमसे आणि ट्रेनर प्रतिक कदम या दोघांनी आयपीएलमधील मुंबई इंडियन्सची जबाबदारी स्वीकारल्याने ती दोन्ही पदे रिकामी आहेत.

ओंकार साळवी सरावाच्या वेळी सर्वांत अगोदर मैदानात येतात सराव संपल्यानंतर शेवटी मैदानातून बाहेर जातात. प्रवीण आमरे, चंद्रकांत पंडीत,समीर दिघे या तीन प्रशिक्षकांबरोबर त्यांनी काम केले आहे.प्रत्येक खेळाडुच्या मजबूत व कमकुवत बाजू साळवी यांना माहिती आहेत. असे एका खेळाडूने टाईम्स ऑफ इंडियाशी बोलताना सांगितले.