मुंबई – ५०० नाबाद !

“खऱ्या मुंबईकराचे भूतकाळाविषयीचे प्रेम एकाच बाबतीत उफाळून येतं, ते म्हणजे क्रिकेट. इकडे क्रिकेट हा एकच खेळ मानला जातो. इतर शहरात हा खेळ मैदानी वगैरे आहे पण मुंबईच्या चाळीच्या गॅलरीत टेस्ट मॅचेस चालतात.”
– पु ल देशपांडे

उद्या म्हणजे ९ नोव्हेंबरला, जेव्हा मुंबईचा संघ वानखेडे मैदानावर बडोद्याच्या विरुद्ध खेळायला उतरेल तेव्हा तो आपला ५००वा रणजी सामना खेळेल. ५०० सामने खेळणारा मुंबई हा रणजी स्पर्धेतील पहिलाच संघ. मुंबईच्या या यशोगाथेमागचा इतिहास खूप मोठा आहे.

क्रिकेट आणि मुंबई हे एकमेकांच्या आकंठ प्रेमात बुडालेले दोघे. छोट्या छोट्या मैदानांवर सुरु झालेली ही कथा अरबी समुद्राच्या साक्षीने आधी ब्रेबॉर्न आणि मग वानखेडे इथे बहरत गेली . ५००वा रणजी सामना ही या अतूट नात्याचीच निशाणी.

न्यूझीलंड किंवा दक्षिण आफ्रिकेसारख्या देशांना सुद्धा हेवा वाटेल इतके क्रिकेटचं वैभव एकट्या मुंबईकडे आहे. हिऱ्याच्या खाणीतुन हिरे निघावेत तसे मुंबई क्रिकेटने भारताला क्रिकेटर दिलेत. मुंबईच्या मैदानात त्या हिराला पडलेले पैलू इतके व्यवस्थित असायचे कि तो जगासमोर चमकणारच याची खात्री असायची. भारताच्या एकूण २८९ कसोटी खेळाडूंपैकी जवळपास ६८ एकट्या मुंबईने दिलेत, म्हणजे एक चतुर्थांश.

रणजी ट्रॉफीवरचं मुंबईचं वर्चस्व तर जगविख्यात आहे. ४१ वेळा मुंबईने आपले नाव रणजी ट्रॉफीवर कोरले आहे. ह्या विक्रमाच्या जवळपास सुद्धा कुठलाच संघ नाहीये. दुसऱ्या स्थानावर असलेल्या कर्नाटक संघाकडे आहेत केवळ ८ विजेतेपदं. आजपर्यंतच्या ८३ अंतिम रणजी सामन्यांपैकी ४६ मध्ये एक संघ मुंबई आहे. संपूर्ण क्रिकेटविश्वात मुंबईपेक्षा जास्त जेतेपद केवळ ऑस्ट्रेलियाच्या न्यू साऊथ वेल्स संघाकडे आहेत (४६).

१९५८-५९ ते १९७२/७३ ही तब्बल १५ वर्षे मुंबई लागोपाठ रणजी ट्रॉफी जिंकली. हे जगातल्या कुठल्याही इतर संघाला जमलेले नाही. मुंबईचे ६-७ खेळाडू तेव्हा भारतीय संघात असत. मुंबई क्रिकेट हे त्या काळात खऱ्या अर्थाने भारतीय क्रिकेटचे “Powerhouse” होते.

“एक वेळ भारतीय संघात प्रवेश मिळेल पण मुंबईच्या संघात जागा मिळवणे कठीण” अशी दर्पोक्ती मुंबईत सांगितली जातं. नावच घ्यायची झाली तर विजय मर्चन्ट, पॉली उम्रीगर, विजय मांजरेकर, एकनाथ सोलकर, रुसी मोदी, दत्तू फडकर, रमाकांत देसाई, विनू मंकड, सुभाष गुप्ते, बापू नाडकर्णी, अजित वाडेकर, दिलीप वेंगसरकर, संदीप पाटील, दिलीप सरदेसाई, सुनील गावस्कर, पद्माकर शिवलकर, फारूक इंजिनिअर, रवी शास्त्री, सचिन तेंडुलकर, विनोद कांबळी, संजय मांजरेकर, अजित आगरकर, झहीर खान, वसीम जाफर, अजिंक्य राहणे ते अगदी रोहित शर्मा पर्यंत. यादी संपता संपत नाही, तरीही अनेक महान खेळाडू राहून जातात.

यांतील एकेका नावाचा जरी भारतीय क्रिकेटवरचा ठसा पाहिला तरी कळून येईल कि मुंबई क्रिकेट काय चीज आहे. वर्षानुवर्षे चालत आलेल्या शालेय क्रिकेट आणि मैदानी क्रिकेट स्पर्धांच्या कठीण परिश्रमाचे हे फलित आहे. लहानपणापासूनच एक प्रकारची शिस्त आणि खेळायची तंत्रशुद्ध पद्धत मुंबई क्रिकेटर्सच्या अंगात मुरत जाते. हिच पुढे मुंबईची ‘खडूस’वृत्ती म्हणून प्रसिद्ध झाली. समोरच्या संघाशी मरेस्तोवर झुंजणे आणि कधीही हार न मानणे हे बाळकडू मुंबई क्रिकेटर्समध्ये भिनत गेलं.

हल्ली देशाच्या कानाकोपऱ्यातून खेळाडू भारतीय संघात येतात. सर्व देशात आता क्रिकेटच्या सुविधा सुधारत आहेत आणि नवनवीन खेळाडूंना वाव मिळत आहे. मात्र मुंबई क्रिकेट अजूनही आपले स्थान राखून आहे. अजिंक्य रहाणे, शार्दूल ठाकूर, धवल कुलकर्णी, श्रेयस अय्यर आणि पृथ्वी शॉ सारखे खेळाडू भारतासाठी मैदान गाजवत राहतील आणि मुंबई क्रिकेटचे नाव उज्ज्वल करतील.

मुंबईच्या यशात अजूनही कोणाचा वाटा असेल तर तो मुंबई क्रिकेटच्या चाहत्यांचा. इतका ‘दर्दी’ चाहतावर्ग क्वचितच कुठल्या संघाकडे असेल. अगदी सुनील गावस्करने खेळलेल्या फॉरवर्ड डिफेन्सचा ‘थडड’ आवाज स्वतः चर्चगेट स्टेशनला ऐकलं असल्याचे साक्षीने सांगणाऱ्या लोक तुम्हाला इकडे मिळतील. खरं Knowledgeable Crowd हे मुंबईचंच.

इकडे अगदी मरिन ड्राईव्हच्या लगत चाललेल्या जिमखानाच्या मॅचेस बघायला सुद्धा गर्दी असते. प्रचंड वेगाने चाललेल्या या मुंबई शहराला कोणी थांबवते तर ते क्रिकेट. “थांब यार, एक ओव्हर बघून जाऊ” असं म्हणत अक्खा दिवस निघून जातो.

मुंबईने भारताचा पहिला क्रिकेट क्लब (ओरिएंट, १८४८) पाहिला, भारतातील Pentangular स्पर्धा पाहिल्या, भारतातील पहिला कसोटी सामना (१९३२) पहिला आणि २०११ ला भारताला विश्वचषक जिंकताना सुद्धा पाहिलं. उद्याचा ५००वा रणजी सामना हा याच यशाच्या दैदिप्यमान साखळीतला पुढला दुवा.
यापुढेही मुंबईचं क्रिकेटवर आणि क्रिकेटचं मुंबईवर प्रेम असंच टिकून राहील हीच एका मुंबईकर क्रिकेट चाहत्याची अपेक्षा.

-ओंकार मानकामे