६७ चेंडूत तब्बल २०० धावा, मुंबईकर रुद्र धांडेचा भीमपराक्रम…

मुंबई: मुंबई आणि क्रिकेट विक्रम आता नवीन राहिले नाहीत. अगदी सचिन- कांबळीच्या विक्रमी भागीदारीपासून ते प्रणव धनवडेच्या हजार धावा असे विक्रम आजपर्यंत आपण पहिले आहे. असाच एक नवीन विक्रम मुंबईकर युवा फलंदाज रुद्र धांडे याने केला आहे.

एका टी२० सामन्यात रुद्र धांडेने ६७ चेंडूत नाबाद द्विशतक झळकावण्याचा पराक्रम केला. ३९ चेंडूंत त्याने आपले शतक केले तर पुढील १०० धावांसाठी त्याने फक्त २८ चेंडू घेतले. या द्विशतकी खेळीदरम्यान त्याने तब्बल २१ चौकार आणि १५ षटकार मारले.
मुंबई विद्यापीठाच्या वतीने आणि मुंबई क्रिकेट असोसिएशनच्या (एमसीए) मान्यतेने ही स्पर्धा सुरु आहे. रिझवी महाविद्यालयाकडून रुद्र सलामीला खेळतो.
काल मालाडच्या प्रल्हादराय दालमिया महाविद्यालयाविरुद्ध खेळताना रुद्रने हा पराक्रम केला.

रुद्राच्या नाबाद द्विशतकामुळे रिझवी महाविद्यालयाने २०षटकात २ फलंदाजांच्या मोबदल्यात तब्बल ३२२ धावा केल्या. प्रतिस्पर्धी दालमिया कॉलेजचा डाव अकराव्या षटकांत 75 धावांत संपुष्टात आल्यामुळे रिझवीला तब्बल २४७ धावांनी विजय मिळाला.

 

मुंबईकर आणि क्रिकेट विक्रम…

सचिन तेंडुलकर आणि विनोद कांबळी…
१९८८ साली सचिन आणि कांबळीने तब्बल ६६४ धावांची भागीदारी केली होती.
अरमान जाफर
भारताचा माजी कसोटी खेळाडू असलेल्या वासिम जाफरच्या पुतण्याने अर्थात अरमान जाफरने शालेय क्रिकेट मध्ये वैयक्तिक ४९८ धावांचा विक्रम २०१० साली केला होता.
प्रणव धनवडे
प्रणव धनवडेच्या नावावर एका सामन्यात सार्वधिक वैयक्तिक धावा करण्याचा विक्रम आहे. त्याने ३२३ चेंडूत तब्बल १००० धावा केल्या होत्या.