मुंबई-आंध्रप्रदेश सामना ड्रॉ, उपांत्यपूर्वफेरीसाठी पात्र होण्याची समीकरणे बदलली

ओंगोल । येथे सुरु असलेला मुंबई विरुद्ध आंध्रप्रदेश सामना आज चौथ्या दिवसाखेर अनिर्णिनीत राहिला. मुंबईने आज ६ बाद २७९ धावांवर डाव घोषित करून आंध्रप्रदेशसमोर ७३ षटकांत ३९७ धावांचे लक्ष ठेवले होते. 

दिवसाखेर आंध्रप्रदेशने ८१ षटकांत ५ बाद २१९ धावा करत पराभव टाळला. पहिल्या डावातील आघडीमुळे मुंबईला या सामन्यात ३ गुण मिळाले आहेत. मुंबईला उपांत्यफेरी गाठण्यासाठी हा सामना जिंकणे गरजेचे होते. 

सामनावीर म्हणून १८ वर्षीय पृथ्वी शॉच्या नावाची घोषणा करण्यात आली. त्याने पहिल्या डावात ११४ तर दुसऱ्या डावात २१ धावा केल्या.  

सध्या क गटात आंध्रप्रदेश ६ सामन्यात १९ गुणांसह अव्वल आहे तर ५ सामन्यात मध्यप्रदेशचे १५ तर तेवढ्याच सामन्यात मुंबईचे १४ गुण झाले आहेत. 

अशी आहेत मुंबई रणजी संघासाठी उपांत्यपूर्वफेरीची समीकरणे 

प्रत्येक गटातून केवळ २ संघ उपांत्यपूर्व फेरीसाठी पात्र ठरणार आहेत. जर मुंबई संघ पुढील सामना जिंकला तरीही त्यांना मध्यप्रदेशच्या कामगिरीवर अवलंबून राहावे लागणार आहे. मुंबई पुढचा सामना त्रिपुरा सोबत तर मध्यप्रदेश ओडिशा संघासोबत खेळणार आहे. 

समीकरण १: जर मुंबईने त्रिपुराविरुद्ध पहिल्या डावातील आघडीवर ३ गुण मिळवले तर मध्यप्रदेश ओडिशाबरोबर पराभूत किंवा आघाडीचे गुण घेणार नाही तेव्हाच मुंबई पुढच्या फेरीसाठी पात्र ठरेल. 

समीकरण २: जर मुंबईने त्रिपुराविरुद्ध सामना जिंकला तर मध्यप्रदेश ओडिशाबरोबर पराभूत झाले अथवा पहिल्या डावात आघाडीचे गुण घेतले तरी मुंबईवर त्याचा फरक पडणार नाही. परंतु अशा वेळी जर मध्यप्रदेश जिंकले तर मात्र मुंबईला उपांत्यपूर्वफेरीला मुकावे लागेल. 

समीकरण ३: जर मुंबईने त्रिपुराविरुद्ध सामना डावाने जिंकला तर मध्यप्रदेश ओडिशाविरुद्ध फक्त डावाने सोडून बाकी कसेही जिंकले अथवा कोणतीही कामगिरी केली तरी मुंबई उपांत्यपूर्व फेरीसाठी पात्र ठरू शकते.