राफेल नदाल शांघाय ओपनच्या अंतिम फेरीत, फेडररशी होणार लढत

शांघाय| अव्वल मानांकित राफेल नदालने आज शांघाय ओपनच्या अंतिम सामन्यात धडक मारली आहे. हा त्याचा कारकिर्दीतील १११ वा अंतिम सामना आहे. त्याने याआधी चीन ओपन स्पर्धा जिंकली आहे.

त्याचा आजचा सामना चौथ्या मानांकित मरिन चिलीचशी होता. हा सामना २ तास ११ मिनिट चालला. या सामन्यात दोन्हीही सेटमध्ये चिलीचने नदालला चांगली झुंज दिली. परंतु अनुभवाच्या जोरावर नदालने सरशी केली.

पहिल्या सेटमध्ये चिलीच नदालला चांगली लढत देत होता. पण ७-५ असा सेट जिंकत नदालने सामन्यात आघाडी मिळवली. तर दुसऱ्या सेटमध्ये दोघांनीही आपापली क्षमता पणाला लावली होती. परंतु नदालने ७-६(७-३) असा चुरशीचा सेट जिंकत या वर्षातल्या १० व्या अंतिम सामन्यात धडक दिली.

नदालचा हा आत्तापर्यंतच्या कारकिर्दीतला ८७१ वा विजय होता.

अंतिम फेरीत नदालचा सामना रॉजर फेडररशी होणार असून फेडररने यावर्षी नदालला ३ वेळा पराभूत केले आहे. फेडररला स्पर्धेत द्वितीय मानांकन आहे.