नदाल स्विस इनडोअर स्पर्धेला दुखापतीमुळे मुकणार

अव्वल मानांकित राफेल नदाल पुढच्या आठवड्यात सुरु होणाऱ्या स्विस इनडोअर बॅसिल स्पर्धेला मुकणार आहे. तो गुढगा दुखापतीमुळे स्पर्धेला मुकणार आहे.

या विषयी त्याने स्वतः माहिती दिली आहे. त्याने ट्विट मध्ये लिहिले आहे की “मला हे घोषित करायला वाईट वाटतंय की मी स्विस इनडोअर बेसल स्पर्धा खेळणार नाहीये.”

रविवारी झालेल्या शांघाय ओपनच्या अंतिम सामन्यात रॉजर फेडरर विरुद्ध नदाल पराभूत झाला होता. त्या सामन्यादरम्यानच त्याला या दुखापतीचा फटका बसला. या सामन्यातील फेडररचा या वर्षातील नादलविरुद्धचा ४ था विजय होता.

त्याचबरोबर २०१५ ला झालेल्या स्विस इनडोअर बेसल स्पर्धेच्या अंतिम सामन्यात फेडररने नदालवर विजय मिळवला होता. फेडररच्या या घरेलू स्पर्धेत तो आत्तापर्यंत ७ वेळा विजयी ठरला आहे. तर नदाल एकदाही ही स्पर्धा जिंकलेला नाही.

नदाल ही स्पर्धा खेळणार नसल्याने द्वितीय मानांकित फेडररला अव्वल स्थानावर येण्याची संधी निर्माण झाली आहे.

नदाल त्याच्या दुखापतीविषयी म्हणाला की “माझ्या डॉक्टरांनी मी शांघायवरून परतल्यावर तपासणी केली. माझ्या गुडघ्याला ताण आला आहे. ही दुखापत शांघाय ओपन चालू असतानाच सतावत होती त्यामुळे आता डॉक्टरांचा सल्ला घेण्याची ही वेळ आहे.”

“चायना मधील दोन आठवडे बीजिंग ओपन विजेतेपद आणि शांघाय ओपनच्या उपविजेतेपदासह उत्तम होते. आता थोडा अराम करायची वेळ आहे. मला स्वित्झर्लंड मधील टेनिस चाहत्यांना विशेष संदेश पाठवायचा आहे ज्यांनी नेहमीच उत्तम पाठिंबा आणि आदर माझ्या आणि रॉजरच्या सामन्यात दाखवला आहे, अशा आहे पुढच्या वर्षी आपण भेटू.”

या वर्षी राफेल नदाल चांगल्या फॉर्ममध्ये होता. त्याने या मोसमात १० वेळा अंतिम फेरी गाठली आहे त्यातील ६ वेळा तो विजयी झाला आहे.