ओम दळवी मेमोरिअल करंडक टेनिस स्पर्धेत अरमानी नलावडे, अभय नागराजन यांना विजेतेपद

पुणे | ओम दळवी मेमोरिअल ट्रस्ट यांच्या तर्फे आयोजित  व एमएसएलटीएच्या मान्यतेखाली पीसीआय/एपीआय ओम दळवी मेमोरिअल 10 वर्षाखालील करंडक टेनिस स्पर्धेत मुलींच्या गटात अरमानी नलावडे हिने, तर मुलांच्या गटात अभय नागराजन या खेळाडूंनी आपापल्या प्रतिस्परध्यांचा पराभव करून विजेतेपद संपादन केले.

महाराष्ट्र पोलिस मोटर ट्रान्सपोर्ट डिव्हिजन टेनिस जिमखाना, परिहार चौक, औंध येथे पार पडलेल्या या स्पर्धेत अंतिम फेरीत 10 वर्षाखालील मुलींच्या गटात मुंबईच्या चौथ्या मानांकित अरमानी नलावडेने अव्वल मानांकित पुण्याच्या देवांश्री प्रभुदेसाईचा 3-5, 4-2, 4-1असा पराभव करून विजेतेपद पटकावले.

मुलांच्या गटात अंतिम फेरीत अव्वल मानांकित अभय नागराजनने सहाव्या मानांकित अर्चित धुतचा 4-2, 4-0असा पराभव करून विजेतेपद मिळवले. अभय हा जीआयएस केम्बरीज स्कुलमध्ये पाचवी इयत्तेत शिकत असून पोलीस रिसर्च सेंटर येथे प्रशिक्षक सोमनाथ पवार यांच्या मार्गदर्शनाखाली सराव करतो. त्याचे हे या वर्षातील गटातील तिसरे विजेतेपद आहे.

स्पर्धेतील विजेत्या खेळाडूंना करंडक व प्रशस्तीपत्रक अशी पारितोषिक देण्यात आली. स्पर्धेचे पारितोषिक वितरण पीसीआय/एपीआयचे संचालक भगवानदास अगरवाल यांच्या हस्ते करण्यात आले. यावेळी स्पर्धा संचालक मारुती राऊत आणि सुपरवायझर प्रवीण झिटे आदी मान्यवर उपस्थित होते.

स्पर्धेचा सविस्तर निकाल: 10वर्षाखालील मुले: उपांत्य फेरी:
अभय नागराजन(1)वि.वि.देव तुराकिया(5)6-0;
अर्चित धुत(6) वि.वि. शार्दुल खवळे 6-5(7-3);
अंतिम फेरी: अभय नागराजन(1)वि.वि.अर्चित धुत(6) 4-2, 4-0;

10 वर्षाखालील मुली: उपांत्य फेरी:
देवांश्री प्रभुदेसाई(1)वि.वि.पार्थसारथी मुंडे(3) 6-4;
अरमानी नलावडे(4)वि.वि.भक्ती मैन्दरकर 6-2;
अंतिम फेरी: अरमानी नलावडे(4)वि.वि. देवांश्री प्रभुदेसाई(1)3-5, 4-2, 4-1.