महाराष्ट्र ऑलिम्पिक असोसिएशनच्या उपाध्यक्षपदी नामदेव शिरगावकर

पुणे। नामदेव शिरगावकर यांची महाराष्ट्र ऑलिम्पिक असोसिएशनच्या उपाध्यक्षपदी एकमताने निवड करण्यात आली आहे. महाराष्ट्र ऑलिम्पिक असोसिएशनची कार्यकारी मंडळाची बैठक पुणे जिल्हा कबड्डी संघटना कार्यालय, पंडित नेहरू स्टेडियम, स्वारगेट येथे नुकतीच पार पडली. या बैठकीत महाराष्ट्र ऑलिम्पिक असोसिएशनचे उपाध्यक्ष प्रल्हाद सावंत यांच्या आकस्मित निधनाने रिक्त झालेल्या जागेवर नामदेव शिरगावकर यांची त्या जागी सर्वानुमते निवड करण्यात आली.

त्यांच्या या निवडीबद्दल महाराष्ट्र ऑलिम्पिक असोसिएशनचे अध्यक्ष अजित पवार, महासचिव बाळासाहेब लांडगे, सुंदर अय्यर आदींनी त्यांचे अभिनंदन केले आहे. शिरगावकर सध्या भारतीय ऑलिम्पिक संघाचे सहसचिव म्हणून काम पाहत आहे. त्यांच्या या अनुभवाचा महाराष्ट्राच्या क्रीडा विकासासाठी नक्कीच फायदा होणार आहे.

या निवडीबाबत शिरगावकर म्हणाले, महाराष्ट्र ऑलिम्पिक असोसिएशन महाराष्ट्रातील क्रीडा क्षेत्रातील शिखर संघटना आहे. आता सध्या भारतीय ऑलिम्पिक असोसिएशनमध्ये काम करत असल्याने तेथील अनुभव महाराष्ट्रातील क्रीडा क्षेत्रात काम करताना होईल. महाराष्ट्रातील क्रीडा क्षेत्राचा विकास आणि नवनवीन गोष्टी करण्यावर भर देणार आहे. तसेच महाराष्ट्रातील खेळाडूंना आंतरराष्ट्रीय स्तरावर खेळण्याची संधी मिळावी यासाठी प्रयत्न करणार आहे.

शिरगांवकर हे भारतीय ऑलिम्पिक संघटनेचे सहसचिव असून, ते मॉर्डन पेन्टॅथलॉन संघटनेचे आशियाई सचिव आहे. ऑस्ट्रेलियात झालेल्या राष्ट्रकुल स्पर्धेत त्यांनी भारतीय संघाचे पथकप्रमुख म्हणून काम पाहिले होते. मार्चमध्ये गोव्यात होणा-या राष्ट्रीय क्रीडा स्पर्धेचे ते देशाचे समन्वयक आहेत.