नाशिक- हायस्कूल ग्राउंड वाचवण्यासाठी उभारणार जनआंदोलन; क्रीडा संघटनांच्या बैठकीत निर्णय

नाशिक महानगर पालिकेने नुकताच अशोक स्तंभ ते गडकरी चौक पर्यंत स्मार्ट सिटी अंतर्गत स्मार्ट रोडची घोषणा केलेली आहे. त्यानुसार छत्रपती शिवाजी स्टेडियम (हायस्कूल ग्राउंड), सी.बी.एस. नाशिक येथे संकल्पित दोन मजली भुयारी वाहनतळ उभारण्याची घोषणा केली आहे. या पार्श्वभूमीवर शहराच्या मध्यवर्ती ठिकाणी उरलेले एकमेव असे मैदान वाचवण्यासाठी क्रीडा संघटनांनी आपल्या बाह्या सरसावल्या आहेत.

याप्रकरणात सर्व क्रीडा संघटनांनी एकत्र येऊन कशापद्धतीने या संकल्पित भुयारी पार्किंग निर्मितीला विरोध करण्यासाठी जनांदोलन उभारायचे यावर चर्चा करण्यात आली. यावेळी मैदानासंबंधी सर्व यंत्रणांना संपर्क करून याविषयीची कल्पना देण्यात येणार असून सर्व सनदशील मार्गाने संघर्ष करण्यात येणार आहे.

यावेळी राज्य खो खो संघटनेचे कार्याध्यक्ष मंदार देशमुख म्हणाले की, मा. उच्च न्यायालयाच्या निर्देशा नुसार छत्रपती शिवाजी स्टेडियम हे मैदान कायमस्वरूपी फक्त खेळासाठी उपलब्ध ठेवावे असे निर्देश असतांना सुद्धा स्मार्ट सिटी करताना अशा मैदानाचा बळी देणे चुकीचे ठरणार आहे. क्रीडा संघटनांशी कुठलीही चर्चा न करता हा निर्णय घेतला गेला आहे. या हायस्कूल ग्राउंडचा कुठलाही वापर होत नाही असा समज करून शासनाने स्मार्ट सिटी कंपनीला येथे भुयारी पार्किंग करण्यास प्रास्ताविक केले असावे. अशा वेळी पार्किंगसाठी हायस्कूल ग्राउंडचा विचार होत असताना पोलीस परेड ग्राउंडचा विचार का करण्यात आला नाही? असा सवाल देशमुख यांनी विचारला आहे.

या मैदानाच्या मालकीचा विचार केला तर मैदानाचा मालकी हक्क जिल्हा परिषदेचा असून छगन भुजबळ पालकमंत्री असताना खेळाडूंना मैदान उपलब्ध व्हावे यासाठी ३० वर्षांचा करार करत हि जमीन जिल्हा क्रीडा परिषदेकडे वर्ग करण्यात आली आहे. त्यामुळे धर्मादाय आयुक्तांनी यासंदर्भात लक्ष घालावे अशीही मागणी यावेळी करण्यात आली आहे.

यावेळी चर्चेत सहभागी झालेल्या विविध क्रीडा संघटनेच्या अनेक पदाधिकाऱ्यांनी अनेक प्रश्न उपठीत केले आहेत. जगात कुठेही अशा मैदानाच्या खाली पार्किंगचा प्रकल्प राबविण्यात आले नाही. आणि हा प्रकल्प सुरु झालाच तरी बांधकाम होण्यासाठी लागणाऱ्या कालावधीत खेळाडूंनी कारायचे काय? या खेळाडूंनी सरावासाठी जायचे कुठे?

या मैदानावर अनेक राज्य व राष्टीय स्तरावरच्या स्पर्धा भरविल्या जातात. इथे दिल्या जाणाऱ्या अनेक प्रकारच्या सुविधा बघता अनेक स्पर्धांचे आयोजन करण्यास नाशिकला संधी मिळाली आहे. जिल्हा क्रीडा अधिकारी रवी नाईक यांच्या संकल्पनेतून साकारलेला स्पोर्ट्स कट्टा उपक्रमालाही मोठा प्रतिसाद या हायस्कूल मैदानावर मिळत असून प्रशिक्षण वर्ग आणि प्रशिक्षकांची उपलब्धता यामुळे वाढली आहे. या मैदानावर खो खो, फुटबॉल, तलवारबाजी, धनुर्विद्या, कॅरमसह अनेक खेळांचे प्रशिक्षण आणि सराव घेतले जातात. यामुळे आजच्या घडीला अनेक खेळाडू येथे सराव करतना दिसतात.
केंद्रीय क्रीडा मंत्री राज्यवर्धन राठोड यांच्या महात्वाकांशी असलेला प्रकल्प खेलो इंडिया अंतर्गत अनेक कार्यक्रम याच मैदानावर राबवले गेले असताना याच सरकारच्या स्मार्ट सिटी प्रकल्पासाठी मैदानाचा आबाळी का? असा प्रश्नही यामुळे उपस्थित होत आहे.

प्रामुख्याने महात्मा गांधी मार्गावरील पार्किंगची समस्या सोडविण्यासाठी हा भुयारी पार्किंगचा हट्ट करण्यात आला असून स्मार्ट रोड अंतर्गत सायकलिंग ट्रॅकचा विचार होतो मात्र याचवेळी हायस्कूल ग्राउंड वरील क्रीडा संस्कृती उध्वस्त करण्यास महापालिका धजावली असल्याचे रोष यावेळी व्यक्त झाला.

कविता राउत यांच्यासह अनेक खेळाडूंनी यास आपला पाठींबा दर्शविला असून खेळामुळेच आम्हाला ओळख मिळाली आहे. त्यामुळे खेळाचे मैदान हे खेळासाठीच असायला हवे. या ग्राउंड बचावाच्या लढाईत आम्ही पूर्णपाने पाठींबा देऊन सहभागी होऊ असे कविता राउत यावेळी म्हणाल्या.

या भुयारी पार्किंग प्रकल्पाला विरोध करण्यैवजी हायस्कूल ग्राउंड वाचवणे हाच अजेंडा राहणार असून सर्व स्तरावर विरोध करून आपला संघर्ष उभारू. यासाठी लागणारी कोणतीही मदत मिळवू अशे ज्युडो करते संघटनेचे सचिव रत्नाकर पटवर्धन यांनी आश्वस्थ केले आहे.

हायस्कूल ग्राउंड वाचवण्याच्या लढ्यात नाशिक्कारांसह कोणताही राजकीय हस्तक्षेप होऊ न देता सर्व पक्षीय नेत्यांना समावून घेण्यात येणार असून सर्व क्रीडा संघटना एकत्र येऊन केवळ खेळ या एकमेव झेंड्याखाली हे जनआंदोलन उभारण्याचा ठराव या बैठकीत घेण्यात आला आहे. यासंदर्भातील पुढील बैठक येत्या शनिवारी (दि. २१) आयोजित करण्यात आली आहे.

​​बैठकीला मुकुंद झनकर (फुटबॉल), शशांक वझे (टेबल टेनिस), रवींद्र मेतकर, रत्नाकर पटवर्धन (ज्युदो), मुनीर तडवी (अॅथलेटिक्स), योगेश शिंदे (ज्युदो प्रशिक्षक), मंदार देशमुख, संजय वाघ, कांतीलाल महाले, उमेश आटवणे, रमेश भोसले (खो खो), चंद्रशेखर सोनावणे (जिम्नॅस्टिक्स), प्रशांत भाबड (कबड्डी), अनंत जोशी (बॅडमिंटन), प्रतिक थेटे (धनुर्विद्या), रवींद्र सिंग ( अॅथलेटिक्स प्रशिक्षक), कविता राउत (अॅथलिट खेळाडू), अविनाश खैरनार, आनंद खरे (क्रीडा संघटक) आदी उपस्थित होते.