चेंडू छेडछाड प्रकरणामुळे या मोठ्या विक्रमाकडे दुर्लक्ष

दक्षिण आफ्रिका विरुद्ध ऑस्ट्रेलिया सामना ऑस्ट्रेलियन खेळाडूंनी केलेल्या चेंडू छेडछाड प्रकरणामुळे चांगलाच गाजला आहे. पण याच सामन्यात ऑस्ट्रेलियाच्या नॅथन लियॉनने कसोटी क्रिकेटमध्ये मोठा टप्पा पार केला आहे.

त्याने काल त्याच्या कसोटी कारकिर्दीत ३०० विकेट्स घेण्याचा टप्पा पार केला. काल दक्षिण आफ्रिकेच्या दुसऱ्या डावात कागिसो रबाडाला बाद करून त्याने हा टप्पा गाठला. कसोटीमध्ये ३०० विकेट्सचा टप्पा गाठणारा लियॉन ऑस्ट्रेलियाचा सहावा गोलंदाज ठरला आहे. या सामन्यात त्याने रबाडानंतर केशव महाराजलाही बाद केले होते.

तसेच पदार्पणानंतर सर्वात कमी दिवसात ३०० विकेट्स घेण्याच्या यादीत लियॉन तिसऱ्या क्रमांकावर आला आहे. त्याने पदार्पणानंतर २३९९ व्या दिवशी हा ३०० विकेट्सचा टप्पा पूर्ण केला. या यादीत शेन वॉर्न(२१९६ दिवस) अव्वल स्थानी तर आर अश्विन(२२१४ दिवस) दुसऱ्या स्थानी आहे.

लियॉनने ३१ ऑगस्ट २०११ ला कसोटी पदार्पण केले होते. त्याने आजपर्यंत ७७ सामने खेळताना ३१.७६ च्या सरासरीने ३०१ विकेट्स घेतल्या आहेत.

द. आफ्रिका विरुद्ध ऑस्ट्रेलिया तिसऱ्या कसोटी सामन्यातच लियॉनच्या आधी दक्षिण आफ्रिकेचा वेगवान गोलंदाज मोर्ने मॉर्केलने कसोटी कारकिर्दीत ३०० विकेट्स घेण्याचा टप्पा पार केला होता. तसेच नुकतेच दोन दिवसांपूर्वी इंग्लंडचा गोलंदाज स्टुअर्ट ब्रॉडने कसोटीत ४०० विकेट्स पूर्ण केल्या आहेत.

ऑस्ट्रेलियाकडून कसोटीत सर्वाधिक विकेट्स घेणारे गोलंदाज:

शेन वॉर्न – ७०८ विकेट्स
ग्लेन मॅकग्रा – ५६३ विकेट्स
डेनिस लिली – ३५५ विकेट्स
मिशेल जॉन्सन – ३१३ विकेट्स
ब्रेट ली – ३१० विकेट्स
नॅथन लियॉन – ३०१ विकेट्स*