राष्ट्रीय कबड्डीपटू अशोक कोंढरेंचे निधन

राष्ट्रीय कबड्डीपटू अशोक कोंढरे यांचे मंगळवारी प्रदिर्घ आजाराने निधन झाले. ते 69 वर्षांचे होते. त्यांच्या मागे दोन मुले, एक मुलगी असा परिवार आहे.

कोंढरे यांना गेल्या काही वर्षापासून मधुमेहाचा त्रास होता. काही दिवसांपूर्वी त्यांचा हा त्रास अधिकच बळावला. त्यांच्या मूत्रपिंडाला सूज आली होती. उपचार सुरू असतानाच दोन दिवसांपूर्वी त्यांना हृदयविकाराचा झटका आला होता. त्यामुळे त्यांची प्रकृती अधिकच खालावली. अखेरीस मंगळवारी रात्री त्यांनी अखेरचा श्‍वास घेतला.

कबड्डीच पण, प्रत्येकवेळी ती वेगळ्या पद्धतीने खेळायची कोंढरे यांची खासियत होती. पुण्यातील राणाप्रताप संघाकडून खेळताना त्यांनी कबड्डीची अनेक मैदाने गाजवली.

उंची आणि ताकद यांचा सुरेख समतोल साधणाऱ्या कोंढरे यांची प्रत्येक चढाई वेगळी ठरायची. त्यामुळे प्रतिस्पर्ध्यामध्ये कोंढरे यांची चढाई हा अभ्यासाचा विषय ठरली होती.

मध्यरक्षकाला लाथ मारुन किंवा झेप घेऊन बाद करण्याच्या त्यांच्या कलेमुळे त्यांना चढाईतले “दादा’ मानले जायचे. चढाईबरोबर क्षेत्ररक्षणाची बाजूही भक्कमपणे सांभाळली.

अशोक कोंढरे हे महाराष्ट्र बॅंकेत सेवेला होते. नोकरी आणि खेळाडू म्हणून निवृत्ती घेतल्यानंतरही त्यांनी नवोदित खेळाडूंना मार्गदर्शन करण्याचे काम सुरू ठेवले होते. राज्य सरकारने त्यांना 1976 साली शिवछत्रपती पुरस्काराने सन्मानित केले होते.

त्यांच्या पार्थिवावर आज वैंकुठ स्मशानभूमीत अंत्यसंस्कार करण्यात आले. मोठा मुलगा सचिन याने त्यांच्या पार्थिवाला अग्नि दिला.

या वेळी शांताराम जाधव, तारक राऊळ, माणिक भोगाडे, शंकर काटे या त्याच्या समकालीन खेळाडूंबरोबर त्यांना आदर्श मानणारे अनेक कबड्डीपटू, सतिश देसाई, उल्हास पवार, प्रकाश पायगुडे, कबड्डी संघटक राजेंद्र देशमुख, बाबुराव चांदेरे, संदेश जाधव, राजेंद्र आंदेकर, राजेश ढमढेरे, योगेश यादव, मधुकर नलावडे, सुरेश नांगरे, शंकुतला खटावकर, मोहिनी चाफेकर यांच्यासह विविध क्षेत्रातील व्यक्तींनी त्यांच्या पार्थिवाचे अंत्यदर्शन घेतले.