राष्ट्रीय तायक्वांदो स्पर्धेस १८ जानेवारीपासून सुरवात

पुणे : होरांगी तायक्वांदो अकादमीच्या वतीने तिसऱ्या ‘खुल्या राष्ट्रीय तायक्वांदो चॅम्पियनशिप’चे आयोजन खराडी येथील कै. राजाराम भिकू पठारे स्टेडियम येथे १८ ते २० जानेवारी दरम्यान करण्यात आले आहे,  अशी माहिती स्पर्धेचे आयोजक बाळकृष्ण भंडारी यांनी दिली.

या स्पर्धेचा उदघाटन सोहळा १९ जानेवारी रोजी सकाळी १० वाजता माजी आमदार बापूसाहेब पठारे यांच्या हस्ते होणार आहे. यावेळी राष्ट्रवादी महाराष्ट्र जनरल कामगार युनियनचे उपाध्यक्षसोमनाथ शिंदे, नगरसेवक महेंद्र पठारे, नगरसेविका संजिला पठारे, नगरसेविका सुमन पठारे, नगरसेवक ऍड . भैय्यासाहेब जाधव, सामाजिक कार्यकर्ते मुकुंद राजगुरू आदी मान्यवर उपस्थितराहणार आहेत.

मणिपूर, कर्नाटक, तामिळनाडू, केरळ, आंध्र प्रदेश, उत्तर प्रदेश, गुजरात, गोवा अशा विविध राज्यातील सुमारे १०० स्पर्धक सहभागी होणार आहेत.  मुले आणि मुलींच्या पुमसे आणि फाईटस यादोन प्रकारांत ही स्पर्धा होणार असून या स्पर्धेत सर्व वयोगटातील सामने होणार आहेत.  स्पर्धेत सुवर्णपदक आणि रौप्य पदक जिंकणाऱ्या शंभर खेळाडूंना साऊथ कोरियातील चोसन विद्यापीठाद्वारेतायक्वांदोचे मोफत प्रशिक्षण दिले जाणार आहे. तसेच विद्यापीठाकडून मोफत राहण्याची आणि प्रशिक्षणाची सोय करण्यात येणार आहे. तसेच या खेळाडूंना विद्यापीठाकडून शिष्यवृत्ती देखील दिली जाणार आहे. या खेळाडूंना गव्हांजू इंटरनॅशनल तायक्वांदो अकादमीकडून होणाऱ्या आंतरराष्ट्रीय तायक्वांदो स्पर्धेत सहभागी होता येणार आहे.

स्पर्धेविषयी बोलताना आयोजक बाळकृष्ण भंडारी म्हणाले की, ‘या स्पर्धेत दरवर्षी हजारो खेळाडू सहभागी होतात. देशात तायक्वांदोचा प्रचार आणि प्रसार व्हावा आणि खेळाडूंना संधी मिळावीयासाठी हि स्पर्धा आयोजित करण्यात येते. हे स्पर्धेचे तिसरे वर्ष असून, खेळाडूंना आपली चमक दाखविण्याची संधी यानिमित्ताने मिळणार आहे.’