एचसीएल आशियाई टेनिस अजिंक्यपद २०१८ स्पर्धेत अव्वल व आंतरराष्ट्रीय खेळाडू झुंजणार

पुणे, दि.१९ ऑक्टोबर २०१८: एचसीएल या जगातील आघाडीच्या समूहातर्फे दुसऱ्या एचसीएल आशियाई कुमार टेनिस अजिंक्यपद स्पर्धेचे शहरात डेक्कन जिमखाना येथे दि. २० ते २७ ऑक्टोबर २०१८ या कालावधीत आयोजन करण्यात आले आहे.
हि अजिंक्यपद स्पर्धा महाराष्ट्र राज्य लॉन टेनिस संघटना यांच्या संलग्नतेने व आंतरराष्ट्रीय टेनिस संघटना(आयटीएफ), आशियाई टेनिस संघटना(एटीएफ) व अखिल भारतीय टेनिस संघटना(एआयटीए)यांच्या मान्यतेखाली होत आहे. जगातील १८ वर्षाखालील कुमार ग्रँड स्लॅम स्पर्धेनंतर आशियांतील बी१ गटातील एकमेव स्पर्धांपैकी एक अशी हि स्पर्धा आहे. स्पर्धेत चीन, थायलंड, जपान, दक्षिण कोरिया, हाँग-काँग, मलेशिया, ईराण, कझाकस्तान, उझबेकिस्तान, इंडोनेशिया आणि भारत  या ११ देशातील विविध भागातून खेळाडू सहभागी झाले आहेत.
एचसीएलच्या माध्यमातून घरच्या मैदानावर भारतीय खेळाडूंना आंतरराष्ट्रीय खेळाडूंशी स्पर्धा करता यावे, हा यामागचा उद्देश्य आहे. कुमार ग्रँड स्लॅम स्पर्धेनंतर जगातील ही दुसऱ्या क्रमांकाच्या दर्जाची स्पर्धा आहे आणि त्यामुळे भारतीय खेळाडूंना जागतिक स्तरावरील प्लॅटफॉर्मसह महत्वपूर्ण आयटीएफ गुण मिळवून उपलब्ध करून देण्याबरोबरच आपल्या आंतरराष्ट्रीय क्रमवारीत आगेकूच करण्याची संधी मिळणार आहे. सहा दिवस चालणाऱ्या या अजिंक्यपद स्पर्धेत १००हुन अधिक भारतीय व आंतरराष्ट्रीय खेळाडूंनी मुले व मुलींच्या एकेरी व दुहेरी गटात आपला सहभाग नोंदविला आहे.  ३२टक्के खेळाडू आंतरराष्ट्रीय स्तरावरील आहेत आणि यामध्ये हाँग यी कोडी वांग(हाँग काँग, जागतिक क्र. २८), थासपोर्न नाकलो(थायलंड, जागतिक क्र. ३८) आणि डॉस्टनबीके ताशबुलताव(कझाकस्तान, जागतिक क्र.५१)हे अव्वल मानांकित खेळाडू आपले कौशल्य पणाला लावणार आहेत.
स्पर्धेत प्रत्येक गटात ३२चा ड्रॉ असणार असून यामध्ये अव्वल २२खेळाडूंना(आयटीएफ क्रमवारीच्या आधारावर) मुख्य फेरीत थेट प्रवेश मिळणार असून उर्वरित आणि वाईल्ड कार्डद्वारे प्रवेश करणाऱ्या खेळाडूंना पात्रता फेरीत प्रवेश मिळणार आहे.
याविषयी बोलताना एचसीएल कॉर्पोरेशन आणि शिव नादर फाऊंडेशनचे धोरण व्यवस्थापकीय सुंदर महालिंगम म्हणाले कि, आम्ही क्रीडा व संगीत क्षेत्रात विविध उपक्रम राबवत असून या माध्यमातून खेळाडूंना अधिकाधिक संधी उपलब्ध करून देणे आणि त्यांनी कारकीर्द समृद्ध करण्याचे तत्वज्ञान एचसीएलने ठेवले आहे. क्रीडा उमक्रमांचा एक भाग म्हणून एचसीएल गेल्या तीन वर्षांपासून टेनिसला पाठिंबा देत आहे आणि आम्ही आंतरराष्ट्रीय खेळाडूंना या स्पर्धेत सहभागी करून अव्वल कुमार भारतीय खेळाडूंना आपल्या खेळात सुधारणा करण्यासाठी व आपले कौशल्य दाखविण्यासाठी एक प्लॅटफॉर्म उपलब्ध करून दिले आहे. तसेच, हि स्पर्धा अतिशय प्रतिष्ठेची अशी स्पर्धा असून सहभागी खेळाडू आपली गुणवत्ता सिद्ध करतील, अशी आशा आहे.
एमएसएलटीएचे मानद सचिव सुंदर अय्यर म्हणाले कि, कुमार ग्रँड स्लॅम स्पर्धेनंतर जगातील ही दुसऱ्या क्रमांकाच्या दर्जाची आशियाई कुमार टेनिस स्पर्धा आहे. भारतात सलग दुसऱ्या वर्षी हि स्पर्धा होत असून एचसीएलने या स्पर्धेला दिलेल्या पाठिंब्याबद्दल आम्ही त्यांचे आभार मानतो. याआधीच्या २०१७च्या मालिकेतदेखील देशभरातून या स्पर्धेला उत्तम प्रतिसाद लाभला आहे आणि यावर्षीदेखील ११देशांतून अव्वल मानांकित स्पर्धक या स्पर्धेत सहभागी होत आहे. यामुळे भारतीय खेळाडू आपली गुणवत्ता सिद्ध करतील आणि सर्व वयोगटात विजेतेपद पटकावतील, अशी आशा आहे.