दुसऱ्या वनडे सामन्यापूर्वी राष्ट्रगीत होणार नाही

पल्लेकेल: भारत विरुद्ध श्रीलंका दुसरा एकदिवसीय सामना उद्या येथे सुरु होत आहे. भारताने कसोटी मालिकेत ३-० असे वर्चस्व गाजविले असून श्रीलंकेविरुद्ध पहिला एकदिवसीय सामना देखील जिंकला आहे.

परंतु श्रीलंका संघाच्या मीडिया मॅनेजरने प्रसिद्धीला दिलेल्या पत्रकानुसार यापुढच्या कोणत्याही सामन्यात राष्ट्रगीत वाजवण्यात येणार नाही. याला मुख्य कारण म्हणजे श्रीलंकेमधील परंपरा. कसोटी मालिकेच्या पहिल्या सामन्यात गॅले कसोटीमध्ये राष्ट्रगीत वाजवले गेले होते परंतु दुसऱ्या आणि तिसऱ्या कसोटी सामन्यात राष्ट्रगीत वाजविण्यात आले नाही.

काय आहे परंपरा:
श्रीलंका संघाच्या मीडिया मॅनेजरच्या म्हणण्यानुसार श्रीलंकेत कोणत्याही मालिकेच्या फक्त पहिल्या सामन्यात राष्ट्रगीत वाजवले जाते. त्यांनतर त्या मालिकेतील कोणत्याही सामन्यात ते वाजवले जात नाही.

क्रिकट्रॅकर वेबसाइटमधील एका बातमीनुसार श्रीलंका देशाचे राष्ट्रगीतही महान भारतीय कवी, लेखक रवींद्रनाथ टागोर यांनी लिहिलं आहे. त्यांनी बंगाली भाषेत लिहिलेलं हे राष्ट्रगीत पुढे सिंहली भाषेत भाषांतरित करण्यात आले.

एकमेव टी२० सामन्यापूर्वी काय?
या दोन संघांदरम्यान एकमेव टी२० सामना प्रेमदासा स्टेडियमवर ६ सप्टेंबर रोजी होणार आहे. प्रथेप्रमाणे मालिकेपूर्वी पहिल्या सामन्यात राष्ट्रगीत गायले जाते. टी२० हा प्रकार वेगळा असल्यामुळे त्या मालिकेच्या पहिल्या सामन्यात राष्ट्रगीत गायले जाणार असल्याचे श्रीलंका संघांच्या मीडिया मॅनेजरने म्हटले आहे.