राष्ट्रीय बॅडमिंटन स्पर्धा: किदांबी श्रीकांतला पराभूत करत एचएस प्रणॉय विजेता

नागपूर। येथे सुरु असलेल्या राष्ट्रीय बॅडमिंटन स्पर्धेत एच एस प्रणॉयने जागतिक क्रमवारीत दुसऱ्या क्रमांकावर असणाऱ्या किदांबी श्रीकांतला हरवून अजिंक्यपद मिळवले आहे.

प्रणॉय आणि श्रीकांतमध्ये चाहत्यांना अपेक्षित असणारी अटीतटीची लढत बघायला मिळाली. या दोघांनीही एकमेकांना चांगली टक्कर दिली. परंतु अखेर या सामन्यात प्रणॉयने २१-१५,१६-२१,२१-७ असा विजय मिळवला.

पहिल्या सेटमध्ये सुरवातीला सामना बरोबरीचा सुरु होता. त्यानंतर मात्र प्रणॉयने सेट मध्यावर असताना श्रीकांतविरुद्ध ११-१० अशी आघाडी घेतली आणि ती आघाडी हळूहळू वाढवत नेऊन सेट २१-१५ असा जिंकला.

श्रीकांतही सामन्यात सहजासहजी हार मानणार नव्हता. त्याने दुसऱ्या सेटमध्ये पुनरागमन केले. पण या सेटमध्ये प्रणॉयनेही श्रीकांतला चांगली लढत दिली. सेटच्या सुरवातीला प्रणॉयने आघाडी मिळवली होती पण श्रीकांतला हि आघाडी मोडण्यात यश आले. अखेर त्याने १३-१३ अश्या बरोबरीनंतर सेट २१-१६ असा जिंकला.

तिसऱ्या सेटमध्ये मात्र प्रणॉयने श्रीकांतवर पूर्णपणे वर्चस्व राखत श्रीकांतला एकही संधी दिली नाही. त्याने हा सेट २१-७ असा सहज जिंकून या स्पर्धेतील आपले पहिले विजेतेपद मिळवले.