राष्ट्रीय बॅडमिंटन स्पर्धा: सिंधू- सायना अजिंक्यपदासाठी आमने-सामने

नागपूर। येथे सुरु असलेल्या राष्ट्रीय बॅडमिंटन स्पर्धेत सायना नेहवाल पाठोपाठ भारताची स्टार बॅडमिंटनपटू पी व्ही सिंधूनेही अंतिम सामन्यात धडक मारली आहे.

तिचा उपांत्य फेरीतील सामना ऋत्विका गड्डे विरुद्ध झाला. या लढतीत ऋत्विकाने सिंधूला कमालीची लढत दिली. या सामन्यात सिंधूचा अनुभव महत्वाचा ठरला. हा सामना तिसऱ्या सेटमध्ये गेला होता. पहिल्या सेटमध्ये ऋत्विकाने उत्कृष्ट खेळ करत सिंधूवर वर्चस्व राखले आणि पहिला सेट १७-२१ असा आपल्या नावावर केला.

दुसऱ्या सेटमध्ये मात्र सिंधूने सामन्यात पुनरागमन केले. हे पुनरागमन मात्र सोपे नव्हते कारण तिला ऋत्विका चांगली टक्कर देत होती. ७-७ असा हा सेट बरोबरीचा चालू होता परंतु नंतर सिंधूने आपला खेळ उंचावत नेत हा सेट २१-१५ असा जिंकून सामन्यात बरोबरी केली.

सामन्याच्या तिसऱ्या आणि निर्णायक सेटमध्ये ऋत्विकाचा खेळ खालावला. तसेच सिंधूने या सेटवर आपले वर्चस्व राखले आणि हा सेट २१-११ असा जिंकत सामनाही जिंकला.

सिंधूचा अंतिम सामना हा सायनाशी होणार आहे.