राष्ट्रीय बॅडमिंटन स्पर्धा: अश्विनी पोनप्पा- सात्विक साईराजला मिश्र दुहेरीचे विजेतेपद

नागपूर। येथे सुरु असलेल्या राष्ट्रीय बॅडमिंटन स्पर्धेत मिश्र दुहेरीत सात्विक साईराज आणि अश्विनी पोनप्पा या जोडीने प्रणव जेरी चोप्रा आणि सिक्की रेड्डी या जोडीला हरवून स्पर्धेचे विजेतेपद मिळवले.

अटीतटीच्या झालेल्या या लढतीत सात्विक आणि अश्विनी या जोडीने प्रणव आणि रेड्डीला २१-९,२०-२२,२१-१७ असे पराभूत केले. पहिला सेट सात्विक आणि अश्विनीने सहज जिंकला आणि सामन्यात आघाडी मिळवली.

दुसऱ्या सेटमध्ये मात्र या दोन्ही जोड्यांमध्ये कमालीची चुरस बघायला मिळाली. शेवटच्या क्षणापर्यंत चाललेल्या या सेटमध्ये अखेर प्रणव आणि रेड्डीने विजय मिळवत सामना बरोबरीचा केला.

तिसऱ्या सेटमध्येही दोन्ही जोड्यांनी चांगली लढत दिली. मात्र प्रणव आणि रेड्डी या जोडीला सात्विक आणि अश्विनी या जोडीने या सेटमध्ये घेतलेल्या आघाडीला तोडता आली नाही. त्यामुळे सात्विक आणि अश्विनीने हा सेट जिंकून या स्पर्धेचे अजिंक्यपद मिळवले.